औरंगाबाद नामांतरावरुन सेना-काँग्रेसमध्ये ‘नुरा कुस्ती’; फडणवीसांचा टोला

औरंगाबाद नामांतरावरुन सेना-काँग्रेसमध्ये ‘नुरा कुस्ती’; फडणवीसांचा टोला

गोपीनाथ मुंडे असते तर राज्य सरकारची हिंमत नसती झाली, ओबीसी आरक्षणावर फडणवीसांचे मोठे वक्तव्य

सत्तेत असलेले काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक वाद सुरु असताना आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ‘नुरा कुस्ती’ सुरु आहे, असा टोला लगावला आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे म्हणून शिवसेना हा मुद्दा उकरुन काढतेय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, शिवसेनेच्या औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसने विरोध केला आहे. किमान समान कार्यक्रमात नामांतराचा विषय नव्हता असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. काँग्रेस आणि शिवसेनेच्या या वादावरुन फडणवीसांनी टोला लगावला आहे.

महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे त्यामुळेच शिवसेनेने पुन्हा एकदा नामांतराचा विषय समोर आणला आहे. महानगरपालिकेची निवडणूक झाली की शिवसेनेला या मुद्द्याचा विसर पडेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “काँग्रेसने संभाजीनगरला विरोध केला काय आणि नाही केला काय, शिवसेना ते निवडणुकीसाठी वापरतं. त्यानंतर ते विसरुन जातात. निवडणुका आल्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव तयार केला आहे. ही यांची नुरा कुस्ती आहे. मी हो म्हणायचं, तुम्ही नाही म्हणायचं, अशी यांची नुरा कुस्ती सुरु आहे,” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

काँग्रेसचा नामांतराला विरोध

औरंगाबादच्या नामकरणाचा वाद पुन्हा एकदा पुढं आला असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. बाळासाहेब थोरात यांनी नाव बदल हा आमचा कार्यक्रम नाही. नाव बदल आणि अशा प्रकारच्या गोष्टींना आमचा विरोध राहील, असं थोरात म्हणाले.

 

First Published on: January 1, 2021 3:15 PM
Exit mobile version