सरकारला घाम फोडणाऱ्या मुंडेंनी श्रमदानातून स्वतः गाळला घाम

सरकारला घाम फोडणाऱ्या मुंडेंनी श्रमदानातून स्वतः गाळला घाम

कुदळ, घमेले घेत श्रम करताना धनंजय मुंडे

विधीमंडळ अधिवेशन असो किंवा जाहीर सभा, आपल्या तडाखेबाज भाषणाने सरकारला घाम फोडणारे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी श्रमदानाच्या माध्यमातून स्वतः घाम गाळला. वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने परळी तालुक्यातील तीन गावात तीन तास त्यांनी सक्रीय श्रमदान केले. आपला नेताच श्रमदानासाठी पुढे सरसावला आहे म्हटल्यावर गावकऱ्यांचा उत्साहही द्विगुणित झाला होता.

श्रमदान करुन घाम गाळताना धनंजय मुंडे

वॉटरकप स्पर्धेत परळी तालुक्यातील अनेक गावांनी सहभाग घेतला असून गेल्या काही दिवसांपासून येथे गावकरी श्रमदान करत आहेत. गुरूवारी सकाळी मुंडे रेवली गावात पोहोचले. हातात कुदळ, घमेले घेत मुंडे यांनीही आपला सहभाग या स्पर्धेत नोंदवला.

‘गाव टंचाईमुक्त होणे काळाची गरज’

पुढचे तीन दिवस धनंजय मुंडे हे मतदार संघातील विविध गावांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी श्रमदानात सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा कोणीही जिंको, त्यापेक्षा पाण्याची चळवळ यशस्वी होणे आणि गाव टंचाईमुक्त होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी धनंजय मुंडे यांनी केले. ते अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने या गावांमध्ये सुरू असलेला कामांसाठी डिझेल तसेच इतर साहित्यही देण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

First Published on: April 26, 2018 12:20 PM
Exit mobile version