पुण्याच्या महिलेला अश्लिल मेसेज पाठवणार्‍या धुळ्याच्या तरुणाचे अपहरण करत नाशकात टक्कल, मारहाण

पुण्याच्या महिलेला अश्लिल मेसेज पाठवणार्‍या धुळ्याच्या तरुणाचे अपहरण करत नाशकात टक्कल, मारहाण

ःसोशल मीडियावर पुण्यातील विवाहित महिलेला अश्लिल मेसेज पाठविणार्‍या धुळ्यातील तरुणाचे दोन महिला व तीन पुरुषांनी अपहरण करुन त्याचे नाशिकमध्ये बळजबरीने सलूनमध्ये टक्कल करत मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. नाना शिताना तांडा (ता.जि.धुळे) येथील विलास मलकान चव्हाण (वय १८) असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विलास चव्हाण याने पुण्यातील जयसिंग कौर छाबडा या महिलेच्या मोबाईलवर काही आक्षेपार्ह मॅसेज टाकले होते. याप्रकरणी छाबडा यांनी मैत्रीण सोनाली राहुल निबाळकर आणि तिचे पती राहुल दिगंबर निंबाळकर यांना माहिती दिली. या तिघांनी निलेश सुरेश जाधव, सागर शिवाजी गायकवाड यांना सोबत कार (एमएच १४-बीएक्स ८३२६)ने धुळे येथील नाना शिताना तांडा गाठला. याठिकाणी विलास चव्हाण याला बळजबरीने गाडीत टाकून नाशिकला आणले. पंचवटी परिसरातील मायको दवाखाना परिसरात विलासला पाचजणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर सलून चालक दिलीप भटू सैंदाणे याला सांगून त्याच्या डोक्यावरचे केस वस्तार्‍याने कापण्यास सांगितले. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. त्यातील एका नागरिकांन पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत सर्वाना पोलीस ठाण्यात आणले. मात्र, त्यावेळी संशयितांनी पोलीस ठाण्यात एका महिला वकिलाला बोलावून घेत पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच, आम्ही सर्व अखिल भारतीय छावा संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगत प्रकरण दाबण्यासाठी संशयितांनी सामाजिक कार्यकर्त्यांकडून दबाव आणला. मात्र, पंचवटी पोलिसांनी दबावाला बळी न पडता कायदयानुसार गुन्हा दाखल केला. याबाबत विलास मलकान चव्हाण याच्या फिर्यादीवरून संशयितांविरोधात अपहरण करणे, मारहाण करून बळजबरीने मुंडन करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व संशयितांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे .

विलास चव्हाण अशिक्षित

विलास चव्हाण हा बंजारा समाजाचा असून, तो तांड्यावर राहत होता . त्याला या महिलेचा मोबाईल क्रमांक कसा मिळाला. त्यावर मेसेज कसे टाकले, याचा पोलीस तपास करीत आहेत. त्यांची भाषा समजायला आणि तो काय बोलतो आहे हे पोलिसांना समजत नव्हते. विलास अशिक्षित असल्याने त्याच्या मोबाईलवरून दुसर्‍याने कोणी मेसेज टाकले का, याचाही पोलीस तपास करीत आहे.

First Published on: July 1, 2021 5:45 PM
Exit mobile version