Dignity of Women : अजित पवारांनी घेतली नितीश कुमारांचीच चाल, महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य

Dignity of Women : अजित पवारांनी घेतली नितीश कुमारांचीच चाल, महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रमुख नेत्यांकडून विविध घटकांशी संपर्क साधला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुला-मुलींच्या दरावरून आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. साधारणपणे सहा महिन्यांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भर विधानसभेत महिलांविषयक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे अजित पवार यांनीदेखील तशीच चाल घेतली आहे का, अशी चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्रात बारामती लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे अशी पवार कुटुंबातच मुख्य लढत होणार आहे. त्यामुळे अजित पवार स्वत: मतदारसंघ पिंजून काढत आहेत. इंदापूरमध्ये त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुला-मुलींच्या जन्मदराबद्दल चर्चा केली. काही जिल्ह्यांमध्ये या दरात तफावत पाहायला मिळते. हजार मुलांच्या पाठीमागे 850 तर काही ठिकाणी 790 मुलींचा जन्मदर दिसतो. हे पाहता पुढे पुढे तर द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय असा प्रश्न पडतो, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली. मात्र, नंतर त्यांनी हात जोडून ‘मला कोणाचाही अपमान करायचा नाही,’ असे सांगत सारवासारव केली.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मशीनमध्ये पटापट बटन दाबा, नाहीतर…; अजित पवारांचा मतदारांना इशारा

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात बिहार विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जातीनिहाय सर्वेक्षणाचे आकडे सादर केले. त्यासोबतच कोणत्या समाजात शिक्षणाचे प्रमाण किती आहे, हे त्यांनी सभागृहात सांगितले. यावेळी, मुलगी शिकलेली असेल तर, लोकसंख्या नियंत्रणात राहू शकते, असे सांगताना पती-पत्नीच्या संबंधांबाबत त्यांनी टिप्पणी केली होती. त्यावरून गदारोळ झाला होता. मात्र, नितीश कुमार यांनी लगेच या टिपणीबद्दल माफी मागितली. माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. मी स्वतःचाच निषेध करून त्या सर्व भाषणाबद्दल खेद व्यक्त करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

आता अजित पवार यांनीदेखील ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांच्यादृष्टीने अवमानजनक वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Pawar Vs Pawar : वाढपी वाढतो म्हणजे त्याने एकट्यानेच स्वयंपाक बनवला असे नाही; राजेंद्र पवारांचा अजितदादांना टोला


Edited by – Manoj S. Joshi

First Published on: April 17, 2024 5:29 PM
Exit mobile version