चाकरमान्यांचा हिरमोड, कोकणात जाण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने नाकारली

चाकरमान्यांचा हिरमोड, कोकणात जाण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने नाकारली

रेल्वे

मुंबई, पुणे ठाणे येथील चाकरमान्यांनी कोकणात जाण्यासाठी ऑनलाइन अर्जभरत गावी जाण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, आता चाकरमान्यांचे हे प्रयत्न असफल ठरले असून काही चाकरमान्यांना परवानगी नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे सदर जिल्ह्याने मान्यता न दिल्याने परवानगी नकारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याचमुळे आता जिल्हा प्रशासना विरोधात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा, वसई तसेच नवी मुंबई येथून काही चाकरमान्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान सिंधुदुर्गमध्ये संस्थात्मक विलगीकरण करण्याची क्षमता जवळपास संपत आल्याने आणि जिल्हयातील वैद्यकीय सुविधांना मर्यादा असल्याने मुंबई, पुणे आणि राज्याच्या इतर कंटेंटमेंट भागातून येणाऱ्यांना ई-पास परवाने देऊ नयेत अशी, मागणी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच रेडझोन मधून आणि इतर ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांच्या बाबतीत केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीनुसार जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची संमती असल्याशिवाय त्यांना परवानगी देऊ नये, अशा आशयाचे पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते. त्यानंतर आता चाकरमान्यांना ऑनलाइन परवानगी नाकारण्यात आलेली आहे.

आम्ही असेच मरायचे काय?

दरम्यान, प्रशासनाच्या या निर्णयामुळे चाकरमान्यांमध्ये संताप व्यक्त होत असून सध्या कोरोनाचे रुग्ण हे शहरी भागात वाढत आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या गावी जाऊ इच्छितो पण, जिल्ह्याप्रशासन आम्हाला येऊ देत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या गावी न येता आहे तिथेच मरायचे का असा सवाल आता चाकरमानी विचारू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात चाकरमानी विरुद्ध प्रशासन असा वाद होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – महारेराअंतर्गत नोंदणी असलेल्या प्रकल्पांना मिळणार मुदतवाढ


 

First Published on: May 19, 2020 10:30 PM
Exit mobile version