राजकीय हेतूने कारवाई नको, जितेंद्र आव्हाडांसाठी शरद पवारांनी केला मुख्यमंत्र्यांना फोन

राजकीय हेतूने कारवाई नको, जितेंद्र आव्हाडांसाठी शरद पवारांनी केला मुख्यमंत्र्यांना फोन

मुंबई – विवियाना मॉलमध्ये जाऊन हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडणे, भाजपा महिला पदाधिकारी रिदा राशीद यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे, अशा प्रकरणांमुळे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड गेल्या दोन ते तीन दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत. काल त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला. या सर्व घडामोडीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लांब होते. मात्र, शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांची बाजू घेण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे.

कोणत्याही राजकीय हेतून अशा कारवाया करू नका, हे उचीत नाही. यातून समाजात वेगळा संदेश जातो. अशा कारवाया टाळा, असे आवाहन शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे.

हेही वाचा – मोदी सरकारने आदिवासींचे जल, जंगल, जमीनचे अधिकार हिरावून घेतले, काँग्रेसचा घणाघात

शरद पवारांच्या या आवाहनाला शिंदे यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. कारवाई राजकीय हेतूने करण्यात आलेली नाही. महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेली कारवाई ही नियमित प्रक्रिया आहे, त्यातून हा गुन्हा दाखल झाला आहे, असे शिंदे यांनी पवारांना सांगितल्याचं म्हटलं जातंय.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज याप्रकरणी ठाणे न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी तक्रारदार महिलेचे वकील आणि आव्हाडांचे वकील या दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडली. जर तक्रारदार महिला ओळखीची होती, तर आव्हाड यांनी त्या महिलेला हात लावायला नको होता. ते तोंडाने बाजूला हो असे सांगू शकत होते. या प्रकरणात अनेक साक्षीदार आहेत, यामुळे आम्हाला पुढे तपास करायचा आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी करत आव्हाड यांच्या जामिनाला विरोध केला.

 

First Published on: November 15, 2022 2:59 PM
Exit mobile version