डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी उत्थानासाठी केलेले कार्य चिरंतन आणि वंदनीय – महापौर किशोरी पेडणेकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी उत्थानासाठी केलेले कार्य चिरंतन आणि वंदनीय – महापौर किशोरी पेडणेकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल मानवी उत्थानासाठी केलेले कार्य चिरंतन आणि वंदनीय असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दरवर्षी अनुयायांचा सागर उसळतो. भारतरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५ व्या महापरिनिर्वाण दिन सोमवारी ६ डिसेंबर, २०२१ रोजी आहे. त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या कार्याची तसेच महापरिनिर्वाण दिनी तयारी बाबतची माहिती देणारी पुस्तिका महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने संकलित केली आहे. या सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुंबईच्‍या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते चैत्यभूमी लगतच्या नियंत्रण कक्ष येथे आज (५ डिसेंबर, २०२१) सकाळी करण्यात आले, यावेळी त्‍या बोलत होत्‍या.

याप्रसंगी उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, उपायुक्त (परिमंडळ २) श्री. हर्षद काळे, ‘जी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. किरण दिघावकर यांच्यासह नागसेन कांबळे, रमेश जाधव, रवी गरुड, प्रतीक कांबळे यांच्यासह अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर याप्रसंगी म्हणाल्‍या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असणारे ‘चैत्यभूमी’ हे प्रेरणादायी स्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण विश्वाला वंदनीय आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे या व्यासपीठावर आम्ही विराजमान आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग व संपूर्ण मानव समाजासाठी त्यांचे असलेले भरीव योगदान सदैव प्रेरणादायी असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दरवर्षी येतात. त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निरनिराळ्या नागरी सेवा-सुविधाही पुरवल्या जातात. कोरोना विषाणूचा तसेच नवीन मायक्राँनचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आणि आपण सर्व सहकार्याने प्रयत्न करत आहोत. महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल अनुयांयाचे विशेष आभारही महापौरांनी मानले आहेत.

त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने डॉ. बाबासाहेब यांच्या जीवन कार्यावर आधारित चांगली माहिती संकलित असलेली पुस्तिका केल्याबद्दल त्यांनी जनसंपर्क विभागाचे कौतुक केले.

महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रकाशित माहिती पुस्तिकेची संगणकीय प्रत महानगरपालिकेच्या portal.mcgm.gov.in  या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.

दरम्यान, प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता देखील अनुयायांना उद्या महापरिनिर्वाण दिनी (दिनांक ६ डिसेंबर, २०२१) अभिवादन करता यावे, यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यमवरून आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन करण्यात येणार आहे.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीद्वारे चैत्यभूमी येथून दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती दूरदर्शनच्या मुंबई केंद्राद्वारे देण्यात आली आहे. याचबरोबर ‘सोशल मीडिया’ खात्यांद्वारे ऑनलाईन थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे. हे प्रक्षेपण पुढील लिंकवर उपलब्ध असणार आहे:-

ट्विटर :- https://bit.ly/6december21TT

युट्युब:- https://bit.ly/6december21YT

फेसबूक:- https://bit.ly/6december21FB

 

First Published on: December 5, 2021 7:42 PM
Exit mobile version