दाभोलकर हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना जामीन

दाभोलकर हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना जामीन

डॉ. नरेंद्र दाभोलकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दाभोलकर हत्या प्रकरणात हत्यार बाळगल्या प्रकरणी सीबीआयने अटक केलेला दोन आरोपींचा जामीन मंजूर झाला आहे. औरंगाबादचा अजिंक्य सुरळे आणि शुभम सुरळे या दोन्ही भावांचा ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. अजिंक्य आणि शुभम हे दोघेही दाभोकर हत्याप्रकरणातला आरोपी सचिन अंदूरेचे मेहूणे आहे.

खंडपीठाने केला जामीन मंजूर

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला आरोपी सचिन अंदूरे याने औरंगाबादमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मेहूण्यांकडे पिस्तूल लपवण्यास सांगितली असल्याचा आरोप सीबीआयने केला होता. या आरोपाविरोधात सुरळे कुटुंबियांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केले होता. मात्र सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यामुळे त्यांनी खंडपीठाकडे जामीनासाठी अर्ज केला. सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर या निर्णयाविरोधात सुरळे यांनी खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला. दरम्यान, नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाशी सुरळे बंधूचा संबंध नसल्याचे तपासात स्पष्ट झाल्याची लेखी माहिती खंडपीठाला सीबीआयने दिली.

आधीच्या ३ आरोपींचा जामीन मंजूर

याआधी १५ डिसेंबरला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित देगवेकर यांना पुण्याच्या सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. केंद्रीय अन्वेषण विभागाने ९० दिवसांत त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले नसल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी हा निर्णय दिला होता. दरम्यान, यापैकी राजेश बंगेरा आणि अमित देगवेकर सध्या गौरी लंकेश खून प्रकरणात कर्नाटकात न्यायालयीन कोठडीत आहे. गोविंद पानसरेंच्या हत्येच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी अमोल काळे विशेष तपास पथकाच्या ताब्यात आहे.

First Published on: February 3, 2019 3:51 PM
Exit mobile version