महामार्गाच्या कामासाठी धार नदीतून पाणी उपसा सुरूच

महामार्गाच्या कामासाठी धार नदीतून पाणी उपसा सुरूच

कर्जत-मुरबाड-शहापूर राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू असून, या कामासाठी मोठ्या प्रमाणात परिसरातील धार नदीसह नाल्यातून टँकरद्वारे पाणी उपसा सुरू केला असल्याने भविष्यात पाणी टंचाई निर्माण शकते. ती टाळण्यासाठी उपसा थांबविण्यास सांगण्यात आले आहे. मात्र तरीही ठेकेदार कंपनीने पाणी उपसा सुरू ठेवल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यामुळे ठोस कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

बेसुमार पाणी उपशामुळे स्थानिकांना भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो याचा विचार करून वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरूंग येथील धार नदीचे पाणी उपसा थांबविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठेकेदाराला नोटीस बजावून पाणी उपसा थांबविण्यास सांगितले आहे. चार महिन्यांपासून ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पाण्याचा बेसुमार उपसा सुरू आहे. परिणामी नदी पात्रात पाणी साठा कमी होऊ लागला आहे. या नदी परिसरातील आदिवासी बांधव या पाण्याच्या स्त्रोतावर अवलंबून आहेत. या पाण्याचा वापर करून भाजीपाला लागवड होत असते. त्यावर त्यांची उपजीविका आहे. त्याचप्रमाणे वन्यप्राणी, गुरांना उन्हाळ्यात याच पाण्याचा आधार असतो.

रस्त्याच्या कामासाठी ग्रामपंचायत हद्दीतील नदीतून होणार्‍या पाणी उपशाने भविष्यात या पाण्यावर अवलंबून असणार्‍या आदिवासी वाड्यांना पाणी टंचाई जाणवू शकते. याचा विचार करता ठेकेदाराला पाणी उपसा करण्यास रोखले आहे. मात्र तरीही पाणी उपसा होत असेल तर ग्रामस्थांसह नदी पात्रात जाणारा रस्ता बंद करावा लागेल.
-योगेश राणे, सरपंच, वारे ग्रामपंचायत

कर्जत-मुरबाड रस्त्याच्या कामासाठी होत असलेला पाणी उपसा लक्षात घेता भविष्यात या भागात पाणी टंचाई निर्माण होणार आहे. याकरिता ग्रामस्थांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीकडून ठेकेदाराला नोटीस बजावून पाणी उपसा थांबविण्यास कळवले आहे. मात्र नोटीस देऊनही पाणी उपसा सुरू असल्याचे समजते. त्यावर कारवाई केली जाईल.
-नीलेश म्हसे, उपसरपंच

ग्रामपंचायतीने नोटीस देऊनही ठेकेदार कंपनी मनमानी करीत आहे. अवैध पाणी उपशामुळे अनेक सवाल निर्माण होणार आहेत. ग्रामपंचायतीने याबाबत ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
-महेश म्हसे, वारे ग्रामस्थ

First Published on: February 12, 2020 2:07 AM
Exit mobile version