कर्तव्यदक्ष, दबंग पोलीस अधीक्षक सचिन पाटील : कार्यकर्तृत्वाचा आढावा

कर्तव्यदक्ष, दबंग पोलीस अधीक्षक सचिन पाटील : कार्यकर्तृत्वाचा आढावा

उच्चपदस्थ पोलीस अधिकारी असूनही ग्रामीण भागाशी विशेषत: शेतकर्‍यांशी नाळ जोडलेली असणारेे, गुन्हेगारांचे कर्दनकाळ अशी ओळख निर्माण करणारे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे पोलीस विभागाला लौकिकार्थाने प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. सुरगाणा येथील बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश करत गुजरातसह महाराष्ट्रातील आरोपींच्या मुसक्या आवळणे, चांदोरीतील मंगल कार्यालयावर छापा टाकत अवैध दारुचा कारखाना उद्ध्वस्त करणे, रोलेट चालवणार्‍यांची पिसे काढत मोक्का कारवाईचा प्रस्ताव देणे, बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रांचे रॅकेट उद्ध्वस्त करणे, या आणि अशा असंख्य कारवायांतून त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे. पाटील यांनी दोन वर्षांत अनेक गुन्ह्यांचा छडा लावल्याने नाशिक ग्रामीण पोलीस उत्तर महाराष्ट्रात टॉप वनवर आहेत. २० सप्टेंबर २०२० मध्ये त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. २० सप्टेंबर २०२१ ते १९ सप्टेंबर २०२२ या कालावधीतील त्यांच्या धडाकेबाज कामगिरीचा दैनिक ‘आपलं महानगर’ने घेतलेला हा मागोवा…

मंगल कार्यालयात मध्यरात्री छापा; कोट्यवधींची बनावट दारु जप्त

नाशिक ग्रामीण पोलिसांनी ११ ऑक्टोबर २०२१ रोजी मध्यरात्री औरंगाबाद महामार्गावर असलेल्या निफाड तालुक्यातील चांदोरी गावातील मंगल कार्यालयावर छापा टाकला. यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील हेसुद्धा घटनास्थळी उपस्थित होते. पोलिसांनी अवैध दारुचा कारखाना उद्ध्वस्त करत बनावट देशी दारुचे सुमारे दोन हजार बॉक्स, १५ हजार देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, 20 हजार लिटर स्पिरिट, दोनशे लिटरचे 100 बॅरेल, रिकामे बॉक्स अंदाजे 10 हजार, देशी दारु बनवण्याचे साहित्य 5 पाण्याच्या टाक्या, एक मालट्रक असा एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी मंगल कार्यालय चालकासह १३ आरोपींना अटक केली होती. या छाप्यात टँगो, प्रिन्स-संत्रा, राकेट आणि गोवा या तीन देशी बनावटीच्या दारूची डुप्लिकेट पॅकिंग करून ही बनावट दारू जिल्ह्यासह राज्याबाहेर विक्रीसाठी तयार केली जात असल्याचे समोर आले आहे.

ऑपरेशन मुस्कान फत्ते; २ अल्पवयीन मुलींची सुटका

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन मुस्कानअंतर्गत ओझर पोलिसांनी अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन परराज्यात विकणार्‍या टोळीला जेरबंद केले. या यशाबद्दल नाशिक ग्रामीण पोलिसांचे कौतूक केले जात आहे. एप्रिल २०२२ मध्ये ओझर येथून बेपत्ता झालेली १४ वर्षीय मुलगी मध्यप्रदेशात असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. त्यांनी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली असता त्यात एक महिला मुलीला नेताना दिसली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश असा तपास केला. दरम्यान, संबंधित मुलीचा विवाह सुरु असलेल्या ठिकाणी पोलीस पोहोचले. त्यावेळी गावकर्‍यांनी विरोध केला. मात्र, पोलिसांनी मुलीची सुखरुप सुटक केली. या मुलीची पाऊणेदोन लाख रुपयांमध्ये विक्री करण्यात आली होती. पोलिसांनी ओझरमधून एक व धुळे येथून दोन महिला आणि मध्यप्रदेशातील दोघांना अटक केली. या गुन्ह्यात पोलिसांनी एकूण आठ जणांना अटक केली.

बोगस प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश

नाशिक ग्रामीण पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातील बोगस प्रमाणपत्रांचे रॅकेट उद्ध्वस्त केले. आंतरजिल्हा बदलीसाठी पोलीस अंमलदारांनी जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍याने बोगस प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी बोगस प्रमाणपत्र देणार्‍या कर्मचार्‍याला अटक केली आहे. कोरोना काळात खासगी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केले जात नव्हते. सर्व हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर्स बंद होते. तरीही, आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेल्या पोलिसांच्या नातेवाईकांचे खासगी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केल्याचे दाखविण्यात आले. विशेष म्हणजे, पुरावा म्हणून हॉस्पिटल्सची बिले व जिल्हा रुग्णालयाकडून प्रमाणपत्र देण्यात आले होते. बिले व प्रमाणपत्रांची तपासणी केली असता ती बोगस असल्याची उघडकीस आली आहेत.

१३ जून २०२२ रोजी भक्तिमय वातावरणात सावळ्या विठुरायाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सारथ्य श्री क्षेत्र त्र्यंबकनगरीमध्ये पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी हजारो वारकर्‍यांना शुभेच्छा दिल्या.

 

 

 

 

भाविकांच्या डीजेवर दगडफेक; पोलीस अधीक्षकांमुळे निघाला मार्ग

चैत्रोत्सवासाठी वणी येथील सप्तश्रृंगी गडावर जाणार्‍या शिरपूर परिसरातील भाविक आणि त्यांच्या डीजेवर मालेगावात ११ एप्रिल २०२२ रोजी रात्री दगडफेक झाल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. खान्देशातून गडावर येणार्‍या भाविकांना मालेगाव शहराबाहेरून वळविण्यात येत असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, भाविक जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरुन जाण्यावर ठाम होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी मालेगावात धाव घेत तणावमय परिस्थिती नियंत्रणात आणली. पारंपरिक मिरवणूक मार्गात बदल न करता शिरपूर डीजे व भाविकांना त्यांनी वेळेतच मार्गस्थ केले. या मार्गावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवाय, सोशल मीडियावर अफवा पसरविणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिला. परिणामी, तणावमय परिस्थिती नियंत्रणात आली.

मालेगावात शांतता ठेवण्यात यश

नोव्हेंबर २०२१ मध्ये परराज्यात काही हिंसक घटना घडल्याच्या अफवेमुळे काही समाजकंटक लोकांनी मालेगावात दंगलसदृश वातावरण तयार केले. समाजकंटकांनी हॉस्पिटल व विविध कार्यालयांवर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच मालेगावात गेलो. पोलिसांना पाचारण करत मालेगावातील परिस्थिती अवघ्या तासांत नियंत्रणात आणली. दुसर्‍या दिवशी मालेगावात रॅली व सभेस बंदी घालत शांततेचे आवाहन केले होते. त्यास सर्वांनी प्रतिसाद दिला, असे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मालेगावात २०५ पोलीस निवासस्थानांचे लोकार्पण

मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे व २०५ पोलीस निवासस्थाने असलेल्या इमारतीचे लोकार्पण ३१ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिसांच्या घरांबाबत बैठक घेण्यात आली. आगामी काळात शासनाच्या सर्व गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

डॉ. सुवर्णा वाजे हत्याकांडाचे गूढ उकलले

मोरवाडी येथील मनपा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृतदेह २५ जानेवारी २०२१ रोजी वाडीवर्‍हेजवळ कारमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी डॉ. वाजेंचा पती संदीप वाजे व त्याचा मावसभाऊ बाळासाहेब म्हस्केला अटक केली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पत्नी डॉ. सुवर्णा वाजे बेपत्ता झाल्याची फिर्याददेखील वाजेने अंबड पोलीस ठाण्यात केली होती. डॉ. वाजे यांच्या खुनाचा ’मास्टरमाइंड’ असल्याचा संशय असलेला बाळासाहेब म्हस्के याने गुन्ह्यातील महत्त्वाची कबुली दिली.

नाशिक जिल्ह्यात शेतकर्‍यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतजमीन मशागत करण्यास सुरुवात केली असता शेतकर्‍यांशी नाळ जोडलेले पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी निफाड दौर्‍यावर असताना शेतकर्‍यांची भेट दिली. विशेष म्हणजे, त्यांनी पेरणी केली. पोलीस अधीक्षक पाटील यांनी दोन वर्षांत फसव्या व्यापार्‍यांकडून तब्बल १० कोटी रुपये शेतकर्‍यांना मिळवून दिले.

 

 

पोलिसांच्या ताफ्यात १०३ नवी वाहने

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीतर्फे 23 चारचाकी व 80 दुचाकी वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तत्कालीन पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत १०३ वाहने नाशिक ग्रामीण पोलीस दलात दाखल झाली. ही वाहने प्रामुख्याने महिला सुरक्षा व निर्भया पथकांसाठी देण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नाशिक ते येवला पोलीस दौड

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून ऑगस्ट २०२२ मध्ये नाशिक ते येवला या ७५ किलोमीटरच्या अंतरात नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने आजादी का महोत्सव पोलीस दौडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ७५ पोलीस सहभागी झाले होते. निफाड येथे न्यायमूर्ती रानडे स्मारक येथे पोलीस दौडच्या वतीने न्यायमूर्ती रानडे यांना अभिवादन करण्यात आले. या दौडचे निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा, पिंपळस नैताळेसह विविध ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.

 

First Published on: September 20, 2022 3:20 PM
Exit mobile version