आचारसंहिता भंग करणाऱ्यांविरोधात अॅपवर करा तक्रार

आचारसंहिता भंग करणाऱ्यांविरोधात अॅपवर करा तक्रार

तक्रार करण्यासाठी अॅप

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात एकूण ४ टप्प्यात निवडणूक घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. महाराष्ट्रात ११ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान चार टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. यंदाच्या निवडणुकीत अनेक नवे उपक्रम निवडणूक आयोगाकडून राबवले जात आहेत. त्यापैकीच एक सुविधा म्हणजे अॅप. आता आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांविरोधात अॅपवर तक्रार करता येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विन कुमार यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

काय आहे हे अॅप

आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने C-Vigil हे मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होताना दिसल्यास त्या प्रसंगाचे छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून दक्ष मतदाराला तक्रार नोंदवता येणार आहे. राज्य स्तरावर स्टेट कॉन्टॅक्ट सेंटर तसेच जिल्हा स्तरावर डिस्ट्रिक्ट कॉन्टॅक्ट सेंटर स्थापन करण्यात आले आहे. मतदारांना सर्व प्रकारची माहिती मिळावी तसेच तक्रार निवारणासाठी १९५० या टोल फ्री क्रमांकाची सुविधा सर्व जिल्ह्यांमध्ये करून देण्यात आली आहे.

‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य

दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालय तसेच अशासकीय संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करून घेण्यात येत आहे. यावर्षी मतदार यादीत २ लाख २४ हजार १६२ अपंग मतदार समाविष्ट आहेत. दिव्यांगांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हीलचेअरची मागणी नोंदवणे आदी सोयी उपलब्ध करून घेण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने PwD (Person with disabilities) हे मोबाईल एप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे.

निवडणुकांसाठी यंत्रणा सज्ज 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी सुमारे ६ लाख इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात येणार आहे. त्यासोबतच पुरेसे पोलिस कर्मचारीही नेमण्यात आले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात २ लाख १५ हजार बॅलेट युनिट, १ लाख २४ हजार कंट्रोल युनिट आणि १ लाख ३५ हजार व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. या मशीनचा वापर पहिल्यांदाच महाराष्ट्रात होणार असल्याने मतदारांमध्ये जागृती आणि विश्वासाहर्ता निर्माण करण्यासाठी सर्व मतदान केंद्रावर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मशीनवर जनतेला माहिती देण्यात येत आहे. आतापर्यंत ५४ लाख ३० हजार जनतेने या उपक्रमात भाग घेतला आहे. तर ३८ लाख ७० हजार जनतेने प्रत्यक्ष या मशीनचा डेमो वापरला आहे. २०१४ च्या तुलनेत यंदा मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ शहरी भागात झाली आहे, तर ग्रामीण भागात मात्र मतदान केंद्रांच्या संख्येत घट झाली आहे. ग्रामीण भागात यंदा ५५ हजार ८१४ मतदान केंद्रे आहेत. तर शहरी भागात ३९ लाख ६५९ मतदान केंद्रे असणार आहेत. शहरी मतदान केंद्रांच्या संख्येत ११ हजार ९९६ इतकी वाढ झाली आहे. याआधी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी २७ हजार ६६३ मतदार केंद्रे उपलब्ध होती.

हेही वाचा – 

अखेर घोषणा झाली! ७ टप्प्यांमध्ये मतदान, निकाल २३ मे रोजी

वाचा! राज्यात कधी, कुठे होणार मतदान

निवडणूक काळात सोशल मीडियावर असतील ‘हे’ निर्बंध!

First Published on: March 10, 2019 9:37 PM
Exit mobile version