मोठी बातमी! अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती ईडीकडून जप्त

मोठी बातमी! अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती ईडीकडून जप्त

राज्याच् माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीची कारवाई अनिल देशमुख यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. तसंच या कारवाईनंतर देशमुख यांच्या अडचणी अधिक वाढणार असल्याच्या शक्यता आहेत.

ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. या स्थावर मालमत्तेची किंमत ४ कोटी २० लाख एवढी आहे. पीएमएलए कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या संपत्तीत वरळीमधला एक फ्लॅट आणि पनवेलमधील एक जमीनीचा समावेश आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित १०० कोटी वसुलीचे आरोप केले आहेत. या आरोपांचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरं तसंच कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले होते. त्याचबरोबर देशमुख यांचे दोन सचिव ईडीच्या कोठडीत आहेत.

दरम्यान, ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर मुलगा ऋषिकेश आणि आता पत्नी आरती यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे.

 

First Published on: July 16, 2021 3:22 PM
Exit mobile version