विनोद तावडेंना लावलेला न्याय उदय सामंतांना लावला जाईल का?

विनोद तावडेंना लावलेला न्याय उदय सामंतांना लावला जाईल का?

विनोद तावडे आणि उदय सामंत

भाजप सरकारच्या काळातले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या ज्ञानेश्वर विद्यापीठातून घेतलेल्या डिग्रीचा वाद अगदी आत्ता आत्तापर्यंत सुरू होता. २०१९च्या निवडणुकांमध्ये देखील डिग्रीच्या भुतानं विनोद तावडेंचा पिच्छा पुरवला होता. मात्र, आता त्याचीच पुनरावृत्ती राज्यातल्या नव्यानं स्थापन झालेल्या महाविकासआघाडीतल्या सरकारमध्ये होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, यावेळी विद्यापीठही तेच आहे, वादही तोच आहे, खातंही तेच आहे, फक्त सरकार आणि संबंधित मंत्री बदलले आहेत. शिवसेना आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील त्याच पुण्यातल्या ज्ञानेश्वर विद्यापीठातून पदविका (डिप्लोमा) पूर्ण केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे विनोद तावडेंवर टीका करणारे तेव्हाचे विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष उदय सामंतांविरोधात काय भूमिका घेणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

मंत्र्यांच्याच डिग्रीला मान्यता नाही!

१९९१मध्ये उदय सामंत यांनी एचएससी अर्थात बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर थेट १९९५मद्ये त्यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठातून अभियांत्रिकी शाखेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. तशी माहिती त्यांनी निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात देखील नमूद केली आहे. मात्र, एकीकडे मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्येच शिक्षण घेण्याचा हट्ट राज्य सरकारकडून धरला जात असताना त्यांच्याच उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्याने मान्यता नसलेल्या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

आता काँग्रेस-राष्ट्रवादीची काय भूमिका?

२०१५मध्ये विनोद तावडेंनी ज्ञानेश्वर विद्यापीठातून डिग्री मिळवली असल्याचं स्पष्ट झालं होतं. हे विद्यापीठ मान्यताप्राप्त नसल्यामुळे त्यातून मिळालेली डिग्री देखील बोगस असल्याची टीका तत्कालीन विरोधी पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. विनोद तावडेंवर मोठ्या प्रमाणावर टीका देखील झाली होती. आता तोच न्याय उदय सामंत यांना देखील लागू करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

First Published on: January 6, 2020 11:34 AM
Exit mobile version