Bird Flu: चिकन खाणं नको रे बाबा, ग्राहकांचा पुन्हा मटणावर ताव

Bird Flu: चिकन खाणं नको रे बाबा, ग्राहकांचा पुन्हा मटणावर ताव

चिकन खाणं नको रे बाबा, ग्राहकांचा पुन्हा मटणावर ताव

भारतात बर्ड फ्लूचा शिरकव झाल्यानंतर मोठ्या संख्येने कोंबड्या आणि इतर पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही बर्ड फ्लूमूळे अनेक हजारो कोंबड्या दगावल्या आहेत. तसेच कावळे आणि बदकांचाही मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूच्या रोगामुळे राज्याती पोल्ट्री फार्मवर मोठे संकट कोसळले आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग कोंबड्यांना होत असल्यामुळे चिकनच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. चिकनचा २०० रुपये असलेला भाव आता ८० ते १२० रुपयांवर येऊन ठेपला आहे. बर्ड फ्लूच्या संसर्गाने हजारो कोंबड्या मरण पावल्यामुळे नागरिकांच्या मनात चिकनबाबत भिती निर्माण झाली आहे. चिकन आणि अंडी खाल्ल्यास बर्ड फ्लू होत नाही, असे पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले आहे. परंतु बर्ड फ्लूच्या धास्तीने लोकांचा मासे आणि मटनावर आपला मोर्चा वळवला आहे. रविवार आणि सुट्टीचा दिवस असल्याने राज्यातील सर्वच शहरांत मासे आणि मटनाच्या खरेदीसाठी लांबचलांब रांगा लागल्याचे दिसून आले आहे.

मुंबईतही ग्राहकांची मासे मटनाला पसंती

मुंबईतही नागरिकांनी बर्ड फ्लूच्या भीतीमुळे मासे आणि मटनाला पसंती दिली आहे. मुंबईतही ग्राहकांची मासे आणि मटनच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बर्ड फ्लूने चिकन विक्रेत्यांचे कंबरडे मोडले आहे. मागील वर्षातही कोरोना विषाणूच्या शिरकाव्यामुळे चिकन विक्रेत्यांना मोठा फटका बसला होता. आता कुठे चिकन विक्रेते सावरत होते तोवर बर्ड फ्लूच्या संसर्गाने हाहाकार घालायला सुरुवात केली. यामुळे चिकन विक्रेत्यांना पुन्हा एकदा मोठा तोटा झाला आहे.

नाशिकमध्ये चिकनच्या मागणीत घट

चिकन आणि अंडीच्या सेवनाने बर्ड फ्लू होतो असा ग्राहकांचा समज असल्यामुळे मासे आणि मटनाच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणात नागरिक मटण आणि मासे खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. नाशिकमध्ये चिकनच्या मागणीतही ५०% घट झाली आहे. तर मटणाच्या मागणीत मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. हॉटेलमध्येही मोठ्या प्रमाणात ग्राहक मटणची माघणी करत आहेत.

कोल्हापुरात मटण खरेदीसाठी लांबचलांब रांगा

कोल्हापुरातील चिकन मार्केटवर ७०% परिणाम झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. बर्ड फ्लूमूळे कोल्हापूरांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. मटन आणि मासे खरेदीसाठी कोल्हापूरकरांनी चांगलीच गर्दी केल्याची दिसले आहे. कोल्हापूरात मटण खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी लांबच लांब रांगाल लावल्या होत्या. परंतु चिकन आणि अंडी सेवन केल्याने बर्ड फ्लू होत नाही असे तज्ञांनी सांगितले आहे. चिकन आणि अंडी चांगले शिजवून खावेत असेही तज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

First Published on: January 17, 2021 5:16 PM
Exit mobile version