तीन महिन्यात आठ जणांचा मृत्यू

तीन महिन्यात आठ जणांचा मृत्यू

मृत्यू

 गेल्या आठवड्यात बोईसर औद्योगिक वसाहतीमधील वेलियन्ट ग्लास वर्क्स या रासायनिक कंपनीत दोन महिला कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर येथील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. गेल्या तीन महिन्यात येथील वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये तब्बल आठ कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे.

वेलियंटमधील झुमली मावी (48) आणि वर्षा मावी (18) या दोन महिला कामगार जेवणासाठी गेल्या होत्या. त्याठिकाणी भोवळ येऊन बेशुद्ध पडल्या. या दोन्ही कामगारांना हॉस्पीटलमध्ये दाखल केले असता त्या मृत झाल्या होत्या. त्यांच्या मृत्यूचे कारण दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही महिला कामगार या मध्य प्रदेशातील होत्या. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर यावर कुणीही आवाज न उठवल्याने हा विषय तूर्तास बंद झाला आहे.

या घटनेनंतर बोईसर औद्योगिक वसाहतींमधील रासायनिक कंपन्यांमध्ये लागणार्‍या आगी, होणारे स्फोट, वायू गळती अशा गंभीर प्रकारात अनेक कामगार मृत्यूमुखी पडत असून अनेक जण जखमी होत आहेत. मे महिन्यात तब्बल पाच कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जूनमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला होता. तर जुलै महिन्यात एक कामगार कंपनीच्या पत्र्यावरून पडून मृत्यूमुखी पडला होता.

त्यानंतर एका कंपनीतील दोन कामगारांच्या अंगावर रासायन पडल्याने त्यांच्या डोळ्यांना गंभीर दुखापतही झाली होती. एसपीएन लॅबोरेटरीतील ही घटना असून दीपांशु सिंग (20) आणि शिवकुमार (27) अशी त्यांची नावे आहेत.

त्याआधी मंदना विविंगमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला होता. तर डीसी टेक्स्टमध्ये शॉक लागून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. स्केअर केमिकलमधे तीन कामगारांना जीव गमवावा लागला होता.

वायूगळतीही मोठ्या प्रमाणावर होत असून गेल्या तीन महिन्यात वायू गळतीच्या अनेक घटना घडला आहेत. बजाज हेल्थ केअरमध्ये वायूगळती होऊन तीस कामगारांना बाधा झाली होती. तर युनियन पार्क केमिकल्स मध्ये पाच कामगारांना वायूबाधा झाली होती. रासायनिक कंपन्यांमधील बहुतेक कामगार परप्रांतिय आणि कंत्राटी पद्धतीवर काम करणारे असून त्यांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेतली जात नसल्याचे उघड झाले आहे. कामगार स्थानिक नसल्याने अपघातानंतर त्यावर कुणी आवाज उठवताना दिसत नाही.

नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आहवलात प्रदुषणात बोईसर औद्योगिक वसाहतीचा पहिला क्रमांक लागला आहे. आता अपघाताची मालिका पाहता याही बाबतीत येथील औद्योगिक वसाहत पहिल्या क्रमांकावर गेल्याशिवाय राहणार नाही.

First Published on: August 21, 2019 5:19 AM
Exit mobile version