जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे

जळगाव : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे विरुद्ध त्यांच्या स्नूषा आणि भाजप खासदार रक्षा खडसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास नकार दिल्याने भाजप स्वतंत्र लढणार आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल निश्चित करण्यात आले होते. मात्र, काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास नकार दिला होता. काँग्रेसच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीनेदेखील भाजपसोबत पॅनल करण्यास नकार दिला आहे. तशी माहिती भाजप नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

या निर्णयामुळे आता राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे विरुद्ध भाजपच्या रक्षा खडसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. तसेच दुसरीकडे काँग्रेसनेसुद्धा स्वबळाचा नारा दिल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. याआधी अजिंठा विश्रामगृहावर १६ ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन, राष्ट्रवादी नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी नेते तथा माजी आमदार सतिश पाटील, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, शिवसेनेचे आमदार किशोर पाटील आदी नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसने भाजपसोबत जाण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याची भूमिका मांडली होती.

काँग्रेसने ‘एकला चलो’चा नारा दिल्यामुळे भाजपने स्वबळाची तयारी केली आहे. भाजप सर्व २१ जागा लढवणार आहे. आजच्या महापालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा बँकेतही विरोधकांना धक्कातंत्र देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

First Published on: October 18, 2021 12:04 AM
Exit mobile version