काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेले धनुष्यबाण सोडवले; मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया 

काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेले धनुष्यबाण सोडवले; मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया 

बंडखोरी करत पक्षातून बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला आज केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू असून निकाल राखून ठेवण्यात आला आहे. मात्र त्यापूर्वी आज निवडणूक आयोगाचा निर्णय आला आहे. या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका पुढे घेऊन जाणार, हा बहुमताचा विजय, सत्याचा विजय आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेले धनुष्यबाण मी आज सोडवले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हा बाळासाहेब आणि आनंद दिघेंच्या विचारांचा विजय आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आणि आम्ही घेतलेला जो निर्णय आहे त्या विचारांबरोबर एकरुप झालेल्या आमदार, खासदार लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि हजारो लाखो सैनिकांचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय राज्यघटनेप्रमाणे कारभार चालतो आणि आम्ही घेतला या राज्यात जी घटना आहे नियम आहे, कायदा आहे. आमचं सरकार या घटनेच्या आधारावर स्थापन झालं, कायद्याने नियमाने झालं, आजचा निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय तो मेरीटवर दिलेला निर्णय आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाबाबत निवडणूक आयोगाला मनापासून धन्यवाद दिले.

राऊतांच्या टीकेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही, हा लोकशाहीचा बहुमताचा विजय आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं. आज आपण पाहिलं बहुमताचं सरकार या राज्यात स्थापन झालं, त्यामुळे घटना, कायदा, नियम हे सगळं बघितल्यानंतर बहुमतचं महत्त्वाचं असतं आणि ते बहुमत आमच्यासोबत आहे. त्यामुळे मेरीटवर निर्णय लागावा ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. हा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर जास्त भाष्य करू शकत नाही, असही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

ठाकरे गटाकडून दुटप्पी भूमिका
त्यांच्या बाजूने निकाल लागतात, तेव्हा न्यायव्यवस्था बरोबर असते. जेव्हा विरोधात निर्णय लागतो, तेव्हा दबावाखाली निर्णय घेतला किंवा न्यायव्यवस्था विकली गेली, असे आरोप केले जातात. अशी दुटप्पी भूमिका घेतली जाते, अशी टीका करून मुख्यमंत्री म्हणाले, जे कोण आज बोलत आहेत, त्यांनी २०१९ ला बाळासाहेबांचे विचार कोणाच्यातरी दावणीला बांधले. त्यांचे विचार विकण्याचे पाप केले. त्यांना ही चपराक आहे.

सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न
आमच्यासोबत ५० आमदार आहोत. १८ पैकी १३ खासदार आमच्यासोबत आहेत. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची गणना केली तर बहुमत आमच्याकडे आहे. तरीही, उद्धव ठाकरेंकडून सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. आपले कार्यकर्ते दुसरीकडे जाऊ नयेत म्हणून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था या स्वतंत्र यंत्रणा आहेत. या संस्थांवर अशा प्रकारचा आरोप केला जात नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आत्मचिंतन करा, उद्धव ठाकरेंना सल्ला
उद्धव ठाकरे आम्हाला चोर म्हणाले. आम्ही ५० आमदार, १३ खासदार आणि हजारो नगरसेवक, लाखो शिवसैनिक चोर आहोत का?. लाखो लोकांना तुम्ही चोर बनवताय आणि तुम्ही एकटे साव. कधीतरी आत्मपरीक्षण करणार की नाही? हे कसे होऊ शकते? याचा विचार करा. आत्मचिंतन करा, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.


 

एकनाथ शिंदेंच्या हाती धनुष्यबाण आणि शिवसेना, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा धक्का

First Published on: February 17, 2023 7:37 PM
Exit mobile version