Eknath Shinde : रोडकरी, पुलकरी आता पोर्टकरी…; ‘या’ नेत्याचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

Eknath Shinde : रोडकरी, पुलकरी आता पोर्टकरी…; ‘या’ नेत्याचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

 

मुंबईः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस बांधला. या महामार्गाचे काम सुरु होते तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गडकरी यांनी रोडकरी म्हणायचे. नंतर गडकरी यांनी उड्डाणपुल बांधण्यास सुरुवात केली. त्यावेळी बाळासाहेब त्यांना पुलकरी म्हणायचे, अशी आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सांगितली. गडकरी यांच्याकडे पोर्ट खाते होते. त्यामुळे ते आता पोर्टकरीदेखील झाले आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

नऊ उड्डाणुलांचा लोकार्पण व ११ उड्डाणपुलांचे भूमिपूजन, या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले. रोडकरी, पुलकरी आणि पोर्टकरी नंतर आता आपल्याला फाटक मुक्त महाराष्ट्र करायचा आहे, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. आमचे सरकार आल्यानंतर विकासाची कामे पटापट होऊ लागली आहेत. केंद्र सरकारकडे एखादा प्रस्ताव पाठवला तर त्याला तत्काळ मंजूरी मिळते, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचाःआनंदाची बातमी : लोअर परळ पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली

आमच्या आधीच्या सरकारने रेल्वेच्या कामातील राज्याचा ५० टक्केचा हिस्सा बंद केला होता. आम्ही तो पुन्हा सुरु केला. बंद पडलेले अनेक प्रकल्प आम्ही मार्गी लावले. समृद्धी महामार्ग सुरु केला. या महार्मागामुळे तेथे गुंतवणूक वाढली आहे. मोठ मोठ्या कंपन्या तेथे उभ्या राहत आहेत. एक महामार्ग काय करु शकतो, याचे उत्तम उदाहरण हा महामार्ग आहे, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

‘राष्ट्रीय महामार्ग, उड्डाण पुलांची कामे कालबद्धतेत पूर्ण करा’

राज्यात सुरू असलेल्या आणि मान्यता मिळालेल्या राष्ट्रीय महामार्ग, उड्डाण पूल, रस्ते यांच्या कामातील अडथळे दूर करून कालबद्धरित्या हे प्रकल्प पूर्ण करावेत. वनांच्या हद्दीतील अस्तित्वात असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती कामांसाठी वन विभागाने प्राधान्याने कार्यवाही करून ते प्रकल्प मार्गी लावावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील विविध रस्ते प्रकल्प तसेच नवीन रस्ते प्रकल्पांबाबत आढावा बैठक गेल्या महिन्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी शिंदे म्हणाले, वाढते शहरीकरण लक्षात घेऊन वाढत्या पायाभूत सुविधांसाठी रस्ते, महामार्ग तसेच उड्डाणपुलांचे विविध प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहेत. त्याचबरोबर काही प्रस्तावित प्रकल्प जमीन संपादन तसेच वन विभागाची मान्यता यासाठी प्रलंबित आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या या प्रकल्पांना तातडीने गती देण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

ठाणे, नवी मुंबईपर्यंतचा प्रवास सुसाट

मुंबईपासून ठाणे आणि नवी मुंबई पर्यंतचा प्रवास आता सिग्नलविरहित आणि सुसाट होणे शक्य होणार आहे, कारण घाटकोपरच्या छेडानगर येथील जंक्शनच्या महत्वाच्या उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एप्रिल महिन्यात लोकार्पण करण्यात आले. घाटकोपर येथील छेडानगर हे पूर्व द्रुतगती महामार्गावरील एक प्रमुख जंक्शन आहे. मानखुर्द घाटकोपर लिंक रोड पूर्ण झाल्यावर पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन येथे नवी मुंबई वरून येणार्‍या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकोंडी होत होती. तसेच ठाण्याच्या दिशेला जाणार्‍या प्रवाशांना सिग्नलवर बराच वेळ थांबावे लागत असे. छेडानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाचे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाल्यामुळे आता ठाण्याच्या दिशेने जाणार्‍या प्रवाशांचा प्रवास आता विनाव्यत्यय आणि सिग्नल विरहित होणार आहे. तसेच सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील कापडिया नगर ते वाकोला जंक्शन या उन्नत मार्गाचे लोकार्पण करण्यात आले आहे. ज्याच्यामुळे आता मुंबईच्या पूर्व व पश्चिम भागाची जोडणी सुकर झाली आहे.

 

 

 

First Published on: June 4, 2023 6:45 PM
Exit mobile version