घरमुंबईआनंदाची बातमी : लोअर परळ पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली

आनंदाची बातमी : लोअर परळ पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली

Subscribe

मुंबई: लोअर परळ, वरळी, प्रभादेवी आणि करीरोड, भायखळा परिसरात वाहतुकीसाठी सोयीस्कर असलेल्या लोअर परळ (डिलाईल रोड) पुलाची पश्चिमेकडील मार्गिका १ जूनपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना, वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या लोअर परळ पुलाचे ८७ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित टप्प्यातील पूर्व दिशेचा पूल जुलै २०२३ अखेरीस वाहतुकीसाठी संपूर्ण क्षमतेने खुला करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी लोअर परळ पुलाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित खात्याला दिले होते.पावसाळ्यापूर्वी नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी संपूर्ण कामाचा सातत्याने पाठपुरावा केला. आगामी कालावधीत पूर्वेकडील पूलाचा भाग हा नागरिकांना वापरासाठी उपलब्ध होण्याबाबत पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय कौंडण्यपुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

लोअर परळ पश्चिमेला सेनापती बापट मार्ग जंक्शन येथून येणाऱ्या गणपतराव कदम मार्गावर उर्मी इस्टेट आणि पेनिनसुला कॉर्पोरेट पार्क येथून रेल्वे स्पॅनपर्यंतची मार्गिका वाहतूक पोलिसांच्या सुचनेनुसार खुली करण्यात आली आहे. याच पुलावर पुढे डावीकडे ना. म. जोशी मार्गावर वेस्टर्न रेल्वे वर्कशॉप आणि दादरच्या दिशेने जाणारी मार्गिका ही वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. डिलाईल रोड पुलाच्या कामातील पूर्वेच्या दिशेची काही कामे आगामी कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यामध्ये वाहतुकीसाठीच्या रॅम्पचे तसेच कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण, पथदिवे, रंगकाम इत्यादी कामे समाविष्ट आहेत. ही कामे पूर्ण करून पूर्व दिशेची मार्गिका जुलै अखेरीस सुरू करण्याचा मुंबई महापालिकेच्या पूल विभागाचा प्रयत्न आहे.

पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बाहेरील बाजूला पदपथ

लोअर परळ येथील पुलाचे पुनर्बांधणीचे काम रेल्वे भागामध्ये पश्चिम रेल्वेकडून तर मुंबई महापालिकेच्या हद्दीत पूल विभागामार्फत करण्यात येत आहे. रेल्वे भागामध्ये एक जुन्या प्लेट गर्डर ऐवजी नवीन दोन ओपन वेब गर्डर या पद्धतीने पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. रेल्वेवरील भाग ओलांडण्यासाठी पुलाच्या तसेच पादचारी यांच्या सुरक्षितेसाठी ओपन वेब गर्डरच्या बाहेरील बाजूने पदपथ बांधण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात ४ जिने व दोन सरकते जिने बांधून सदर पदपथ जोडण्यात येणार आहेत.

- Advertisement -

पुलाखाली अतिरिक्त भुयारी मार्ग

जुना लोअर परळ पूल हा मातीचा भराव आणि दगडी बांधकामाद्वारे बांधण्यात आला होता. त्यामुळे बाजूचे सेवा रस्ते (सर्व्हीस रोड) अरुंद होते. तसेच पोहोच मार्गामधून क्रॉसिंगसाठी फक्त एक भुयारी मार्ग उपलब्ध होता. परंतु आता नव्याने बांधण्यात येणारा लोअर परळ पूल स्टील गर्डर वापरून बांधण्यात येत असल्यामुळे पुलाखाली क्रॉसिंगसाठी मुबलक जागा उपलब्ध असणार आहे. तसेच बाजूचे सेवा मार्ग हे पूर्वीपेक्षा रुंद असणार आहेत. लोअर परळ पूलाच्या पुनर्बांधणीच्या कामात ९० मीटर लांबीचे आणि ११०० टन वजनाचे दोन गर्डर हे पश्चिम रेल्वेच्या रूळांवर स्थापित करणे हे संपूर्ण प्रकल्पातील सर्वात मोठे आव्हानाचे काम होते. त्यानंतर दक्षिण दिशेकडील भाग हा तोडकामासाठी ऑक्टोबर २०२२ मध्ये महापालिकेकडे सोपविण्यात आला. पश्चिम रेल्वेने याठिकाणी २२ जून २०२२ रोजी पहिला स्टील गर्डर तर दुसरा गर्डर २४ सप्टेंबरमध्ये लाँच केला.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -