एकनाथ शिंदे गुवाहाटीमधून मुंबईच्या दिशेने?

एकनाथ शिंदे गुवाहाटीमधून मुंबईच्या दिशेने?

विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकारणात वाऱ्याच्या वेगाने हालचाली झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना कानोकानी खबर न लागता त्यांचे तब्बल ४२ आमदार सूरतहून गुवाहाटीला दाखल झाले. तेथे गेल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची मागणी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यामागे राष्ट्रीय शक्ती असल्याचंही कालच्या व्हिडिओतून समोर आलं आहे. दरम्यान, आता आणखी एक मोठी बातमी समोर येतेय. (Eknath Shinde leaves Guvahati for heading mumbai?)

हेही वाचा – माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात

तीन दिवस गुवाहाटीला मुक्काम ठोकल्यानंतर एकनाथ शिंदे गुवाहाटीतून निघाले असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमातून समोर येत आहे. मात्र, ते आता दिल्लीला जाणार की मुंबईत येणार? गुवाहाटीनंतर त्यांचा दौरा नेमका कुठे असणार याबाबत अद्यापही खुलासा आलेला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची पुढची रणनिती नक्की काय असणार यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार ते तेथील देवीच्या दर्शनालाही गेले होते.

गुवाहाटीत गेल्या तीन दिवसांपासून राहत असलेल्या एकनाथ शिंदे यांना तिथल्या आसामच्या काँग्रेस प्रमुखाने राज्य सोडण्याची विनंती केली आहे. तुमच्यामुळे आसाम राज्य सरकार बंडखोर आमदारांचा पाहुणचार करण्यात व्यग्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तसंच, माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. झाडाची फुलं न्या, फांद्या न्या, मूळ मात्र नेऊ शकत नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीला उद्धव ठाकरेंबरोबर युवा नेते आदित्य ठाकरेही उपस्थित होते. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

मी जिद्द सोडली नाही, जिद्द अजूनही कायम आहे. मेलो तरी सेना सोडणार नाही असे म्हणणारेही पळून गेलेत. मला सत्तेचा लोभ नाही, वर्षा सोडून मातोश्रीवर आलो. कोण कसं वागलं यात मला जायचं नाही. मला वाटलं सीएमपदाची खुर्ची हलतेय, मात्र ते मानेचं दुखणं होतं. कोरोनामुळे डोळ्यात पाणी आलं ते अश्रू नाहीत. मी बरा होऊ नये म्हणून काही जण पाण्यात देव ठेवून बसले होते, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

First Published on: June 24, 2022 5:27 PM
Exit mobile version