काँग्रेसला मिळणार अखेर नवा अध्यक्ष; 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरदरम्यान होणार निवड

काँग्रेसला मिळणार अखेर नवा अध्यक्ष; 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरदरम्यान होणार निवड

नवी दिल्ली:  काँग्रेस पक्षाला अखेर प्रदीर्घ काळानंतर नवा अध्यक्ष मिळणार आहे. यासाठी येत्या 21 ऑगस्टपासून नव्या अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरु होणार आहे. ही प्रक्रिया 20 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. यामुळे पुढच्या महिन्यात काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे. मात्र 2019 मध्ये पद सोडल्यानंतर राहुल गांधींच्या पुन्हा निवडीबाबत अद्याप कोणताही स्पष्टता नाही, त्यामुळे साहजिकच काँग्रेसकडून इतर नावांचा विचार सुरु आहे. त्यामुळे राहुल गांधीनी अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यास गांधी घराण्याबाहेर व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्ष स्थानी विराजमान होईल. यामुळे काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे.

काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांनी राहुल गांधींना पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी अनेकवेळा आवाहन केले होते, मात्र त्यांनी टाळाटाळ केली होती. त्यामुळे राहुल गांधी ही निवडणूक लढणार की नाही हे काही दिवसात स्पष्ट होईल. दरम्यान राहुल गांधींनी जर निवडणूक लढवण्यास नकार दिल्यास काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना ही निवडणुक लढवण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करणार असे म्हटले जाते.

येत्या 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरदरम्यान काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. ज्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे. दरम्यान अध्यक्ष पदाच्या निवडीतील नामांकनाची तारीख निश्चित करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली जाईल, ज्यात काँग्रेस अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करेल.

काँग्रेसची 3500 किमीच्या पदयात्रेला 7 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. यात राहुल गांधी देखील सहभाग दर्शवणार आहेत. मात्र या यात्रेपूर्वी काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळवून देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले जाते. सध्या सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत.

राहुल गांधी यापूर्वी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर होते. मात्र अनेक निडणुकीतील पराभवानंतर ते स्वत: अध्यक्षपदावरून पायउतार झाले. त्यानंतर काँग्रेसचं अध्यक्षपद काही काळ रिक्त होते. मात्र सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतली जी पक्षातील अनेकांना खटकली, ज्यानंतर काँग्रेसच्या नेत नेत्यांकडून अध्यक्ष पदाची निवडणुक पुन्हा घेण्याची मागणी केली होती.


विनायक मेटे मृत्यूप्रकरणात चालकाचे वर्तन संशयास्पद! ज्योती मेटेंनी उपस्थित केले अनेक प्रश्न


First Published on: August 16, 2022 1:57 PM
Exit mobile version