विनायक मेटे मृत्यूप्रकरणात चालकाचे वर्तन संशयास्पद! ज्योती मेटेंनी उपस्थित केले अनेक प्रश्न

मुंबई – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनामुळे (Vinayak Mete Death Case) अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यांचा घातपात की अपघात असल्याचा चर्चा सुरू आहेत. त्यातच, विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आता विनायक मेटे यांचा चालक एकनाथ कदम (Driver Eknath Kadam) यांच्यावरही प्रश्न उभे केले आहेत. अपघात नेमका कोठे झाला, ही गोष्ट चालक सांगू शकत नव्हता. त्यामुळे ही बाब खटकणारी असल्याचं वक्तव्य विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

हेही वाचा – विनायक मेटेंचा घातपात? आयशर ट्रकने पाठलाग करत कट मारला होता, कार्यकर्त्याचा दावा

ज्योती मेटे म्हणाल्या की, आमच्या गाडीवर काम करणाऱ्या प्रत्येक चालकाला महाराष्ट्राच्या रस्त्यांची खडानखडा माहिती असते. एकनाथ कदम आमच्याकडे गेल्या वर्षांपासून कामाला आहेत. त्यामुळे मेटेंचा अपघात नेमका कोठे झाला हे सांगता न येणं ही खटकणारी बाब आहे. मी गाडीच्या चालकाशी बोलले पण अपघात कुठे झाला हे त्याला सांगता येत नव्हतं. बीड ते मुंबई मार्गावर तो नियमित गाडी चालवतो. आमच्या सर्व चालकांना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील रस्त्यांची इत्थंभूत माहिती असते. त्यामुळे अपघाताचे स्थळ आणि वेळ हे कळू न शकणं ही खटकणारी बाब आहे, असं ज्योती मेटे म्हणाल्या.

सत्य दडपवलं जातंय

विनायक मेटे यांच्या मृत्यूची जी वेळ सांगितली जातेय, त्याआधीच त्यांचा मृत्यू झालाय हे मला त्यांची नाडी तपासताच समजलं. मी एक डॉक्टर आहे, त्यामुळे मला हे समजू शकतं. म्हणून, सत्य दडवलं जातंय, असा मला संशय आहे. विनायक मेटे यांचा अपघात आणि त्यांचा मृत्यू यामध्ये एक दुवा आहे, जो सध्या गायब आहे. याप्रकरणात काहीतरी कच्चे दुवे आहेत, काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होतोय, असंही ज्योती मेटे म्हणाल्या.

अपघात झाल्यानंतर चालकाने पोलिसांना कळवण्याऐवजी बीडमधील लोकांना कळवले. त्यांनी वैद्यकीय मदतीसाठीही फोन केला नाही. त्यांनी असं का हेच कळत नाहीय, असंही ज्योती मेटे यांनी स्पष्ट केलं.


…अन् माझी शुद्ध हरपली

विनायक मेटे यांचा अपघात झाल्याचं कळताच आम्ही मुंबईतील कामोठे रुग्णालयात पोहोचलो. दरम्यान, त्या मार्गावरील ओळखीच्यांना मदतीसाठी फोन केले. यावेळी त्यांचा अपघात आहे की घातपात असा कोणताच संशय मनात आला नाही. मी मुंबईतील कामोठे रुग्णालयात त्यांना पाहिलं तेव्हा त्यांचा नाडी तपासली आणि माझ्या संवेदनाच संपल्या. मी त्यांच्या नाडीचे ठोके तपासले तेव्हा मला पल्स लागली नाही. त्यामुळे माझी शुद्धच हरपली, असं ज्योती मेटे म्हणाल्या.

…तर सखोल चौकशी झाली पाहिजे

या अपघातप्रकरणी चालक योग्य माहिती देत नसेल तर त्याची सखोल चौकशी व्हावी. हा अपघात आहे की घातपात याचा तपास व्हावा असं ज्योती मेटे म्हणाल्या.