मौजमजेसाठी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी बनले बाईकचोर

मौजमजेसाठी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी बनले बाईकचोर

पुणे पोलीसांनी अटक केलेले आरोपी

मौजमजा करण्यासाठी खिशात भरपूर पैसे असावेत, मात्र त्यासाठी दुसरा कोणताही मेहनतीचा मार्ग न स्वीकारता इंजिनिअरिंग कॉलेजच्या सहा विद्यार्थ्यांनी थेट चोरीचा शॉर्टकट मार्ग स्वीकारला. त्यासाठी हे विद्यार्थी सर्रासपणे महागड्या बाईक चोरी करू लागले. एकामागो एक वाहने चोरीची प्रकरणे उघडकीस येत होती. मात्र चोर नक्की कोण आहेत, यावर पोलीस स्वतःच चक्रावून गेले होते.

अखेर पोलिसांना या चोरीचा छडा लागलाच. बाईक्स चोरणार्‍या या सहा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या टोळीतील एका संशयास्पद तरुणाची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी त्याला लागलीच अटक केली. त्यानंतर त्याच्या उर्वरित पाच सहकार्‍यांना गजाआड केले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या २२ लाख रुपये किमतीच्या सुमारे १८ बाईक्स हस्तगत केल्या. या प्रकरणाचा विमानतळ पोलीस अधिक तपास करत आहेत. आदेश उर्फ विनायक रामचंद्र शिंदे, आशिष सुनील सरदार, माधव कृष्णा गोपाल प्रसाद सिंह, सोहेल गुलाब शेख,किरण खैरनार आणि सोमनाथ प्रकाश पाटोळे, अशी अटक करण्यात आलेल्या या तरुणांची नावे आहेत. हे सर्व पुण्यातील एका इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी लोहगाव परिसरात गस्त घालत असताना आरोपी सोहेल शेख हा दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो चालवत असलेली दुचाकी चोरीची असल्याचे त्याने कबूल केले. पोलिसांनी त्याला अटक करून अधिक चौकशी केली असता मित्रांच्या मदतीने त्याने पुणे शहरात अनेक ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले. चोरलेल्या गाड्या विकून मिळालेल्या पैशातून आरोपी मौजमजा करत असल्याचे आरोपींनी सांगितले.

First Published on: July 11, 2018 7:05 AM
Exit mobile version