गणेशोत्सवात इंग्रजी शाळांनी सुट्ट्या नाकारल्या

गणेशोत्सवात इंग्रजी शाळांनी सुट्ट्या नाकारल्या

गणपती

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सर्वत्र तयारी अंतिम टप्यात आली असतानाच मुंबईसह राज्यातील अनेक इंग्रजी माध्यमातील शाळांनी यंदा पुन्हा एकदा गणेशोत्सवात सुट्टी जाहीर न केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यामुळे इंग्रजी आणि मराठी असा वाद पुन्हा एकदा विकोप्याला जाणार असून सुट्टी नाकारण्यात अनेक कॉन्वहेंट शाळांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पालकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून याविरोधात मनसेने थेट शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्याकडे धाव घेत या शाळांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.

मुंबईसह राज्यातील शाळांना उत्सव कालावधीत सुट्टी द्यावी आणि त्या काळांत परीक्षा घेऊ नये, असा निर्णय राज्य सरकारने ८ सप्टेंबर २०१५ रोजी घेतला आहे. त्यानुसार त्यांनी शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. हा शासन निर्णय जाहीर करताना त्यांनी या सुट्ट्यांचे नियोजन करताना तेथील शिक्षणाधिकार्‍यांनी स्थानिक ठिकाणाच्या गरजेनुसार शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक शिक्षक संघ यांच्या सहमतीनुसार व शिफारशीनुसार सुट्ट्यांचे नियोजन करण्याची सूचना दिल्या आहेत. मात्र राज्यातील अनेक शाळा या निर्णयाचा गैरवापर करीत आहेत. काही पालक शिक्षक संघटनांतील सदस्यांना हातीशी घेऊन ते सुट्टींचे नियोजन करतात. त्यानुसार अनेक शाळांनी यंदा गणेशोत्सव सुट्ट्या रद्द केल्या आहेत. शाळांच्या या मनमानी कारभाराविरोधात पालकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. शाळा जाणीवपूर्वक या सुट्ट्या देत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

गणेशोत्सवासाठी सुट्टी देण्याबाबत अनेक पालकांनी पालक शिक्षक संघाकडे मागणी केली असतानाही अनेक शाळांनी सुट्टी न देता या कालावधीत परीक्षांचेही आयोजन केले आहे. ही शासन निर्णयाची ही एकप्रकारे पायमल्ली केली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. तर अशा सर्व शाळांमधून शिक्षणाधिकार्‍यांना भेट देऊन शासन निर्णयाचे पालन झाले आहे की नाही, याबाबत पडताळणी करण्याची मागणी केली असल्याचे याबद्दल बोलताना चेतन पेडणेकर म्हणाले की. ज्या शाळा सुट्ट्या देत नसतील त्यांना मनसे स्टाईलमध्ये उत्तर देण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

First Published on: August 27, 2019 5:37 AM
Exit mobile version