मॉरिशियसच्या चौकात उभारणार शिवरायांचा अश्वारूढ पुतळा; नाशिकचे शिल्पकार तांबट यांची कलाकृती

मॉरिशियसच्या चौकात उभारणार शिवरायांचा अश्वारूढ पुतळा; नाशिकचे शिल्पकार तांबट यांची कलाकृती

नाशिक : मॉरिशियस येथील चौकात २८ एप्रिल रोजी शिवरायांचा जयघोष करण्यात येणार आहे. निमित्त आहे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळयाचे. मुळचे नाशिक येथील रहिवासी असलेले विकास तांबट यांनी गेली तीन महिने प्रचंड मेहनतीने हा पुतळा साकारला असून हा पुतळा मॉरिशियसकडे रवाना झाला आहे.

१४ फुट उंचीचा हा पुतळा फायबर ग्लास मिडीयममध्ये तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मॉरिशियमधील हा सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. याबाबत बोलततांन शिल्पकार विकास तांबट म्हणाले, शिवरायांचा पुतळा तयार करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी लागला. शिल्पकार नानासाहेब करमरकर यांनी तयार केलेला पुतळा शिवाजीनगरमध्ये बसविण्यात आला आहे. त्याच धर्तीवर हा पुतळा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आला. सुरूवातीला मातीचे मॉडेल तयार करण्यात आले. पुतळा मॉरिशियसला पाठवण्यासाठी तीन मॉडेलमध्ये हा पुतळा तयार करण्यात आला. याकरीता वडील शिल्पकार दयाराम तांबट यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.

मातीच्या मॉडेलवर फायबर ग्लासचे मोल्ड टाकण्यात आले आहे. मोल्डमधून फायबर ग्लासचा पुतळा निघाल्यावर त्याचे फिनीशिंग व इतर किरकोळ कामे पुर्ण झाली शेवटी पुतळयाला रंग देण्यात आला. उद्योजक विठठल चव्हाण आणि रोहिदास हांडे महाराज यांच्या पाठींब्याने हा पुतळा तयार करण्यात आला. २८ एप्रिल रोजी मॉरिशियसच्या मुख्य चौकात हा पुतळा बसविण्यात येउन अश्वारूढ पुतळयाचे अनावरण करण्यात येणार असल्याचे तांबट यांनी सांगितले. पुतळयाच्या प्रस्थाना दरम्यान अभय तांबट, माजी नगरसेवक मारूती तुपे, सुधीर जगताप, हडपसर येथील शंभुराजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी, आळंदी देवाची येथील वारकरी भाविक उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांचा पुतळा मॉरिशियसमध्ये बसविण्यात येणार आहे याचा विशेष आनंद आहे. हा पुतळा निर्माण करण्याचे भाग्य मला लाभले याचा मला विशेष आनंद आहे. गेली तीन महिने विशेष प्रयत्न करून १४ फुट उंचीचा हा पुतळा साकारण्यात आला. यात मला माझ्या टीमचे विशेष सहकार्य लाभले. बोटीने हा पुतळा मॉरिशियसला पाठविण्यात येणार असल्याने तीन मोल्डमध्ये तो साकारण्यात येऊन रवाना करण्यात आला आहे. : विकास तांबट, शिल्पकार

First Published on: March 4, 2023 4:35 PM
Exit mobile version