नागोठणे आरोग्य केंद्रात विलगीकरण कक्ष स्थापन

नागोठणे आरोग्य केंद्रात विलगीकरण कक्ष स्थापन

नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची माहिती देताना डॉ. चेतन म्हात्रे. सोबत इतर कर्मचारी. (छाया ः राजेश भिसे)

रायगड जिल्हा परिषदेच्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारपासून अलगीकरण कक्ष (क्वारंटाईन शेल) कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी दिली. त्यासाठी १० खाटांची सुविधा उपलब्ध करण्यात येऊन या कक्षाचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून, रायगड जिल्ह्यात अशा प्रकारचे कक्ष तालुका स्तरावर स्थापन केले असले तरी जिल्ह्यात ग्रामीण स्तरावर फक्त या केंद्राचीच निवड करण्यात आली आहे.

जगभर हाहा:कार माजविलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार हा अलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यासाठी केंद्रातील एक वेगळी इमारत त्यासाठी वापरण्यात आली असून, त्या ठिकाणी दहा खाटा ठेवण्यात आल्या असल्या तरी प्रत्येक विभाग वेगवेगळा आहे. येथून नोकरीनिमित्त परदेशात असणार्‍या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्यांची यादी शासनाकडे यापूर्वीच देण्यात आली आहे. परदेशातून येणार्‍या नागरिकांकडे आरोग्य विभागाचे विशेष लक्ष असून, दोन दिवसांत असा कोणी नागरिक येथे आला असेल तर या कक्षात त्याला आणून सुरक्षेच्या दृष्टीने त्याची तपासणी करून त्याला जर काही त्रास असल्यास त्याच्यावर याच कक्षात उपचार करण्यात येणार आहेत.

या कक्षात वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका, तसेच आरोग्य विभागाच्या इतर कर्मचार्‍यांसह पोलीस तैनात ठेवण्यात येणार आहेत. यावर तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, गट विकास अधिकारी यांचे नियंत्रण राहणार आहे. सकाळी 10 आणि दुपारी 4 अशी दोन वेळा अधिकृत माहिती घेण्यात येऊन तसा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी आणि साथ रोग अधिकारी यांना देण्यात येणार आहे. करोना संदर्भात जनजागृती होण्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व उपकेंद्र, तसेच एसटी बस स्थानक, रेल्वे स्थानक याठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.

First Published on: March 19, 2020 3:02 AM
Exit mobile version