‘मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी प्रत्येक सुपुत्राने प्रयत्न करावा’

‘मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी प्रत्येक सुपुत्राने प्रयत्न करावा’

२७ फेब्रुवारी २०२१ या मराठी भाषा दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी प्रत्येक सुपुत्राने प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन केले आहे. मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित एका परिसंवाद कार्यक्रमात लाईव्हच्या माध्यमातून बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मराठीत बोलयला आपण लाजतो पण समोरचा फाडफाड इंग्रजी बोलायला लागले की आपण घाबरतो. पण फ्रान्स, जर्मनी, चीन सारख्या देशांमधील नागरिक त्यांची भाषा बोलतात. भाषेचा अभिमान जरुर असावा दुराभीमान नसावा. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

गेली काही वर्षे आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. मुख्यमंत्री म्हणून हा माझ्यासाठी हा दुसरा कार्यक्रम आहे. कोरोना संकटामुळे आता आपण थेट भेटू शकत नाही. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भेटतो. याला आभासी भेट म्हणतात. पण मी येथे स्पष्ट करू इच्छितो की, मराठी भाषे प्रतीची आपली तळमळ, भावना मराठी भाषेबद्दलचे प्रेम अजिबात आभासी नाही. मराठी भाषा दिन म्हटले की फक्त एकच दिवस मराठी भाषेचे प्रेम उचंबळून येणे  चुकीचे. मराठी ही आपल्या रोमारोमात भिनलेलली भाषा आहे. माझी माती, माझी माता, माझे मातृभूमी.. माझी मातृभाषा हा आपल्यासाठी अभिमानाचा गौरवाचा विषय असून हा गौरव जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा  मिळण्याच्या एका ध्येयाने एक होऊन पुढे जाऊ या, मग पाहू छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही. असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, आपल्या मातृभाषेतून विचार करणे, बोलणे, व्यक्त होणे म्हणजे कमीपणाचे नाही. पण भाषेबद्दलचा कमीपणा किंवा आपल्या मनातील न्यूनगंडपणा कमी होत नाही तोपर्यंत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार नाही. जो संस्कृती जपतो तो भाषा जपतो. त्यामुळे संस्कृती जपली तर भाषा आपोआप जपली जाणार. दरवर्षी याविषयाची चर्चा होते, छत्रपती शिवाजी महाराजांनीही याचपद्धतीने मराठी भाषा जपली आणि राज कोशाची निर्मिती केली. कारभारातील मराठी भाषा समजली पाहिजे. काही शब्द मलाही समजत नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे राजभाषा कोश तयार केला त्याप्रमाणे आपणही मराठी भाषा कोश का नाही निर्माण का करु शकत नाही. गेली कित्येक वर्षे आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत. केंद्रीय समितीपुढे हा विषय मान्यतेसाठी प्रलंबित आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नाकारणारे जे कोणी आहेत त्यांना खडसावून सांगितले पाहिजे की ही महाराष्ट्राची, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. ती नसती तर तुम्ही आज असता का? याचा विचार करा. माझ्या दृष्टीने मराठी भाषेला अभिजात भाषा देण्यासाठी हा एकच पुरावा पुरेसा आहे. असेही ते म्हणाले.

सावकर, कुसुमाग्रजांच्या मराठी भाषेप्रतिच्या आठवणींना उजाळा देत मुख्यमंत्री म्हणाले, सावरकरांनी अनेक शब्दांना मराठी अर्थ दिला. इंग्रजीच्या मराठी भाषांतरनाला अर्थ नाही. त्यामुळे खरी मराठी भाषा जपण्यासाठी बोली भाषेची स्पर्धा घ्या. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल पण त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. मराठी भाषेची ताकत पुन्हा पहायची आवश्यकता असेल तर ती दाखवण्याचे काम आपणच केले पाहिजे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी कुसुमाग्रजांची “मराठी माती” ही कविता वाचून दाखवली त्याचा अर्थ आणि महत्व समजून सांगितले.  फेब्रुवारी महिना आला की तात्यासाहेब, मराठी भाषा आठवायला नको, वर्षभर कार्यक्रम करा, दिनापुरती भाषा मर्यादित राहू नये असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कुसुमाग्रजांना,  स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळकांना वंदन करून  मराठी भाषेचे त्यांचे  संस्कार जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करू असे म्हटले.

यापुढे ते म्हणाले, अनेक थोर व्यक्तींने मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मराठी भाषा दिनापूर्ती मर्यादित न राहता ती रोज जोपासली पाहिजे. माझी माती, माझी आई, माझी मातृभूमी मराठी असल्याने तिचे ऋण मी फेटले नाही तर मी नालायक एवढी जरी भावना मनात आली तर भाषा जपली जाईल असे म्हणता येईल. मराठी भाषा दिनापर्यंत मराठी अभिजात दर्जा मिळाला पाहिजे यासाठी प्रत्येक सुपुतत्राने प्रयत्न केले पाहिजे मग बघू कोण देत नाही. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला दिलेले योगदान आपण वाठवू जरी शकलो नाही तर जपू शकतो.असेही ते म्हणाले. यावेळी विधान परिषेदेचे  सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई,  संसदीय कार्य मंत्री अनिल परब,  विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

First Published on: February 26, 2021 4:19 PM
Exit mobile version