Exclusive : “गोदावरीचे पाणी पिण्यायोग्य”, प्रशासनाचा दावा; “पिऊन दाखवावे” गोदाप्रेमीचे आव्हान

Exclusive : “गोदावरीचे पाणी पिण्यायोग्य”, प्रशासनाचा दावा; “पिऊन दाखवावे” गोदाप्रेमीचे आव्हान

अजिंक्य बोडके । नाशिक

गोदावरी नदी आणि उपनद्या या नाशिक जिल्ह्याला मिळालेले मोठे वरदान आहे. मात्र, मागील काही वर्षात गोदावरीच्या प्रदूषणाची पातळी इतकी वाढली आहे की, नदीच्या बाजूला उभ राहणेही जिकरीच होते, इतका दुर्गंध नदीतून येत असतो. गोदावरी नदीचे प्रदूषण दृश्य स्वरुपात दिसून येते. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ व नाशिक महापालिकेने केलेल्या पाणी चाचणीच्या अहवालानुसार, गोदावरीचे पाणी पिण्यायोग्य असल्याची बाब समोर आली आहे. हे पाणी पिण्यायोग्य असेल तर महापालिका व प्रदुषण नियंत्रण महामंडळ प्रशासनाने हे पाणी सर्वांसमोर पिऊन दाखवावे असे आव्हान पर्यावरण प्रेमींनी केले आहे.

पाण्यातील पी.एच. (पोटेंशियल ऑफ हायड्रोजन) मूल्य सरासरी ७.५ इतका असल्याची बाब समोर आली आहे. पाण्यातील पी.एच. मूल्य किमान ६.५ ते ८.५ या दरम्यान असेल तर ते पाणी पिण्यायोग्य आहे असे मानले जाते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नाशिक महापालिकेनुसार गोदावरी व उपनद्यांमधील पाणी पिण्यासाठी चांगले असल्याचे समोर येत आहे. हे पाणी जर खरच पिण्यायोग्य असेल तर या दोन्ही प्रशासनाच्या अधिकार्यांनी हे पाणी पिऊन दाखवावे असे आव्हान पर्यावरण प्रेमींनी केले आहे.

प्रवाहित पाण्यात ‘बीओडी’चे प्रमाण कमीच

बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांडची (बीओडी) पातळी नव्या निकषांप्रमाणे १० च्या आत असणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण महामंडळाने वर्षभर केलेल्या पाहणीत ही पातळी १० च्या आत असल्याचे निदर्शनास येते. मात्र, महामंडळाच्या वतीने नेहमी प्रवाहित पाण्याचीच तपासणी केली जाते. प्रत्यक्षात नदी केवळ पाच ते सहा महिने प्रवाहित असते. उर्वरित कालावधीत तिच्यात डबके साचतात. त्या पाण्यातील बीओडीची पातळी कितीतरी अधिक असते. खासगी संस्थेने वा महापालिकेने केलेल्या पाण्याचा तपासण्या बघता नदीपात्रातील बीओडीची पातळी ही २० वा त्यापेक्षा अधिक आढळते. समुद्र, नदी, तलाव इत्यादी पाणीसाठयांमध्ये ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात असायलाच हवी. कारण त्यावर जलचर प्राणी, वनस्पती व हरित शैवाल यांचे जीवन अवलंबून असतात. पर्यावरणातील अन्नसाखळीत या सर्वाची महत्त्वाची भूमिका आहे. हे प्रमाण एक लिटरमागे १ ते २ मिलीग्रॅम इतके असेल तर पाणी फारच चांगले, ३ ते ५ मिलीग्रॅम असेल तर समाधानकारक आणि ६ ते ९ मिलीग्रॅम असेल तर त्यात प्रदूषणकरणारे सेंद्रिय घटक अस्तित्वात आहेत असे समजले जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळ व नाशिक मनपाच्या चाचणी आकडेवारी नुसार गोदावरी व उपनद्यांचा बीओडी सरासरी ३.५ ते ४ प्रती मिलीग्रॅम आहे. अर्थात पाण्यातील ऑक्सीजन पातळी समाधानकारक आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, गोदावरी व उपनद्यांमध्ये जलसृष्टीचे अस्तित्वच राहिले नाहीये. मग नाशिक मनपा व प्रदूषण नियंत्रण मंडळ कशाच्या आधारे हा दावा करतय? नेमकं कश्या पद्धतीने पाण्याच्या चाचण्या केल्या जातात हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

अंंघोळीसाठीही पाणी अयोग्यच

टाकळी मलजलशुध्दीकरण केंद्रातून बाहेर पडणार्‍या दुषित पाण्यामुळे गोदावरीचे प्राणी प्रदूषित होत असल्याचा अहवाल सिंहस्थापूर्वी निरीने दिला होता. हे पाणी पिण्यास दूरच, अंघोळीसह योग्य नसल्याचे अहवालात नमूद केले होते. सिंहस्थाच्या काळात नदीला जोडणारे नाले बंद करण्यात आले होते. त्यामुळे पाणी तुलनेने शुध्द होते. परंतु, त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे.

बीओडी म्हणजे काय?

बायो -आक्सिजन डिझॉल्व्ह्ड (बीओडी) म्हणजे पाण्याची गुणवत्ता मोजण्याचा महत्वाचा निकष ठरतो. हा बीओडी म्हणजे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण असते. ते प्रति लीटर मिली ग्रॅममध्ये मोजतात. सूक्ष्म जलचर पाण्यात विरघळलेल्या स्वरुपातील ऑक्सिजनचा वापर करत असतात. कमी प्रमाणातील बीओडी म्हणजे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी, असा निष्कर्ष काढता येतो.

पाण्याच्या प्रदुषण पातळीत वाढ का होते?
प्रदूषित पाण्याने काय परिणाम होतात?
First Published on: February 8, 2023 1:32 PM
Exit mobile version