फडणवीसांनी मध्यरात्री घेतली शिंदेंची भेट, गुप्त बैठकीत काय ठरलं?

फडणवीसांनी मध्यरात्री घेतली शिंदेंची भेट, गुप्त बैठकीत काय ठरलं?

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या रात्रीच्या भेटीचा सिलसिला अद्यापही सुरूच असल्याचं सिद्ध झालं आहे. या दोघांमध्ये सोमवारी मध्यरात्री सुमारे दीड तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशिराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यपालांना भेटल्यानंतर त्यांनी लागलीच एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Eknath Shinde-Devendra Fadnavis Secret Meeting)

हेही वाचा – फडणवीसांचे वेषांतराचे नाट्य, शिवसेनेचा फडणवीसांवर रोखठोकमधून हल्लाबोल

गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चर्चेत आहेत. त्यांच्यावर विनयभंगाचा (Molestation Allegation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दडपशाही असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येतोय. यावरून संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जातोय. तसंच, राष्ट्रवादीच्या महिला शिष्टमंडळानेही काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari) यांची भेट घेतली. त्यामुळे काल शिंदे-फडणवीस यांच्या मध्यरात्री झालेल्या गुप्त बैठकीत जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी चर्चा झाली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन (Winter Session) होणार आहे. या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचं नियोजन सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबात या बैठकीत चर्चा झाली असल्याचंही सांगण्यात येतंय. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यात नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मध्यरात्री झालेल्या गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

हेही वाचा मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात शिंदे – ठाकरे गटांत राडा, राजन विचारेंवर फेकल्या पाण्याच्या बाटल्या

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची रात्री-अपरात्रीच भेट घेतली होती. एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी ते वेष बदलून जायचे असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीच एका कार्यक्रमात केला होता. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या मध्यरात्रीच्या बैठकांची चर्चा नेहमीच रंगत असते.

First Published on: November 15, 2022 8:44 AM
Exit mobile version