मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात शिंदे – ठाकरे गटांत राडा, राजन विचारेंवर फेकल्या पाण्याच्या बाटल्या

दरम्यान, हे प्रकरण श्रीनगर पोलीस ठाण्यात गेलं. मात्र, तिथे गेल्यानंतरही पोलीस ठाण्याबाहेर पुन्हा या दोन्ही गटांत राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलीस आता कोणावर कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे. 

Shivsena MP Rajan Vichare

ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. किसन नगरमध्ये ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने येत दोन्ही गटांमध्ये तुफान राडा झाला. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे (Shivsena MP Rajan Vichare) यांच्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या बॉटल्स फेकून मारल्या. त्यामुळे प्रकरण चिघळले. दरम्यान, हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा – ‘माझ्या वडिलांवरील आरोप खोटे…’, मुलगी नताशा आव्हाडची प्रतिक्रिया, तर महिला आयोगाने मागवला अहवाल

ठाण्यातील किसन नगर येथे ठाकरे गटाकडून  सोमवारी सायंकाळी कार्यकर्ता मेळावा आणि नव्या शाखेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार राजन विचारे उपस्थित राहिले होते. किसन नगर हा परिसर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. त्यामुळे या परिसरात कार्यक्रमाच्या निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आले.

ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला सुरुवात होताच, तिथे शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि नगरसेवक हजर झाले. त्यांनी कार्यक्रम करण्यास विरोध केला. त्यामुळे दोन्ही गटांत बाचाबाची झाली. सुरुवातीला एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मारहाण सुरू झाली. शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. तसंच, खासदार राजन विचारे यांच्यावर पाण्याच्या बॉटल्स फेकल्या असल्याचंही सांगण्यात येतंय.

हेही वाचा – उद्या सकाळपर्यंत अटक करू नका, ठाणे न्यायालयाचा आव्हाडांना दिलासा

शिंदे गटाची मनमानी सुरू आहे. स्वत:च्या पदाचा गैरवापर सुरू आहे. त्यांची सत्ता असलेल्या ठिकाणी ते फिरू देण्यास मज्जाव करतात. अशी गुंडगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती”, असा घणाघात राजन विचारे यांनी केला.

दरम्यान, हे प्रकरण श्रीनगर पोलीस ठाण्यात गेलं. मात्र, तिथे गेल्यानंतरही पोलीस ठाण्याबाहेर पुन्हा या दोन्ही गटांत राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलीस आता कोणावर कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे.