आदित्य ठाकरेंच्या हाकेला चक्क फडणवीसांनी दिली ओ…; झालं असं काही

आदित्य ठाकरेंच्या हाकेला चक्क फडणवीसांनी दिली ओ…; झालं असं काही

अहमदनगरः आमचे अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत, असे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. आदित्य यांचे म्हणणे सत्य आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

उपमुख्यमंत्री फडणीस म्हणाले, अजूनही उद्धव आणि आदित्य यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. आम्ही वैचारिक विरोधक आहोत. आम्ही शत्रू नाही, हे मी अनेक कार्यक्रमात सांगितले आहे. राजकारणात कधीच कोणी शत्रू नसतो. वैचारिक विरोधक असतात. सध्या महाराष्ट्रात खूप कटुता आली आहे. ही कटुता हळूहळू संपायला हवी. उद्धव यांनी वेगळी वाट पकडली आणि मी वेगळ्या वाटेला गेलो.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरुन चुरस सुरु आहे. तशा आशयाचे बॅनरही लागत आहेत. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान कोण, मुख्यमंत्री कोण यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नेहमीच चुरस सुरु असते. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील हे कोणालाच अपेक्षित नव्हते. तरीही ते मुख्यमंत्री झालेच ना. त्यामुळे भविष्यात काहीही होऊ शकते. संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य गांभीर्याने घ्यायला नको. ते एका पक्षाचे नेते आहेत. काय बोलावं. कुठे बोलावं याचे भान त्यांनी ठेवायला हवे. बोलताना संयम ठेवायला हवा, असा सल्ला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. शेतकऱ्यांना चार हजार मेगाव्हॅट सोलार वीज कशी देता येईल याचा विचार सध्या सरकार करत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस आणि आमचे संबंध आजही चांगले आहेत. आमच्या मनात कुठलीही कटुता नाही, माझ मनं साफ आहे. आमच्या घरात असंच वातावरण आहे. आमच्यावर अनेक जणांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, मात्र आम्ही तशा प्रकारची टीका कधीच केलेली नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे संबंध कसे होते, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही पर्सनली काही घेत नाही.” असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एक गुगली टाकली.

First Published on: February 23, 2023 3:40 PM
Exit mobile version