पुराचा तडाखा! पालघरहून पुण्यात आलेली कार गेली वाहून, ५ प्रवाशांची सुखरूप सुटका

पुराचा तडाखा! पालघरहून पुण्यात आलेली कार गेली वाहून, ५ प्रवाशांची सुखरूप सुटका

मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. राज्यातील नदी आणि धरणं भरली असून ओव्हरफ्लो व्हायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यरात्री पुण्यातील एस.एम.जोशी पुलाजवळ थरारक घटना घडली. पालघरहून पुण्यात आलेली ५ प्रवाशांची कार पुरामुळे वाहून गेली. हे कुटुंबीय मध्यरात्रीनंतर या भागातून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कार वाहून जाऊ लागली. या कारमध्ये लहान मुलासह पाच जण होते. या घटनेची माहिती मिळताच येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांची सुटका केली.

पुण्यात पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे मुठा नदीला पूर आला आहे. भिडे पुलावर पाणी जमा झाल्यानंतर पुलावरील अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या. ही घटना मध्यरात्री २ च्या सुमारास घडली. रोप, लाईफ जॅकेटच्या साहाय्याने नदी पात्रात उतरून जवानांनी या कारमधील पाचही प्रवाशांची सुखरूप सुटका केली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पालघरमधील कुटुंबीय हे आपल्या पुण्यातील नातेवाईकांकडे आले होते. रजपूत विटभट्टीकडून पात्रातून रस्त्याने जात असताना त्यांची कार गरवारे पुलाखाली अडकली होती. एरडवणा, जनता वसाहत सेंट्रल फायर स्टेशनची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि मोठी दुर्घटना टळली.

पालघरमधील रेस्क्यू केलेले कुटुंबीय

पालघरमधील हे लालवाणी कुटुंबीय होते. आठ वर्षांच्या मुलाचं नाव कृष्णा आणि त्याच्या मोठ्या बहिणीचं नाव वंचिका आहे. प्रिया लाल वाणी, कुणाल लाल वाणी आणि कपिल लाल वाणी, अशी या कुटुंबियांची नावे आहेत.

खडकवासला साखळी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसाने खडकवासला धरणातून नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आल्याने मुठा नदीवरील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे भिडे पूल गुरुवारी सायंकाळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने डेक्कन, शिवाजीनगर आणि मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

दरम्यान, नदीपात्रात दहा ते पंधरा चारचाकी अडकल्या होत्या. विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे नदीपात्र परिसरात पोलीस बंदोबस्ताबरोबरच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.


हेही वाचा : तुमच्यावर आमचा वॉच आहे, चुकीचे निर्णय घेतले तर समर्थन नाही; मुख्यमंत्र्यांनी नव्या मंत्र्यांना सुनावले


 

First Published on: August 12, 2022 9:32 AM
Exit mobile version