पुणतांब्यातील आंदोलन पेटलं; आज करणार रास्तारोको

पुणतांब्यातील आंदोलन पेटलं; आज करणार रास्तारोको

पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे आंदोलन

‘देता की जाता?’ असा इशारा देत किसान क्रांती संघटनेच्या वतीने राज्यभर यात्रा सुरू असतानाच सोमवार, २ फेब्रुवारीपासून पुणतांब्यात बळीराजाच्या लेकींनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान काल, गुरुवारी उपोषणाला बसलेल्या मुलींपैकी तीन जणांची प्रकृती खालावली होती. तर त्यापैकी एक शुभांगी जाधव हिला प्रकृती नाजूक असल्याचे बोलले जात होते. अखेर, आज शुभांगीची तब्येत नाजूक असल्यामुळे तिला नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या या अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. मात्र अजूनही सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आज पुणतांब्यात रास्तारोको करण्यात येणार आहे.

वाचा – पुणतांब्यात शेतकऱ्यांच्या मुली करणार अन्नत्याग आंदोलन

अन्नत्यागामुळे मुलींचे वजन घटले

चार दिवसांपासून अन्नत्याग केल्याने आंदोलक मुलींचे वजन घटले आहे. त्यातील शुभांगी जाधव हिची प्रकृती काल खालावली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राहाता तहसीलदारांना अहवाल दिल्यानंतर तहसीलदार माणिक आहेर यांनी शुभांगीला नगर येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र हॉस्पिटलमध्ये जाण्यास शुभांगीने नकार दिला होता. अखेर आज तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

विविध मागण्यांसाठी उपोषण 

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी किसान क्रांती संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय यात्रा काढली जात आहे. सातबारा कोरा करा, शेत मालाला दीड पट हमीभाव द्या, दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव द्या, अशा प्रमुख मागण्या बळीराजाच्या लेकींनी केल्या आहेत. किसान क्रांती संघटनेचे राज्य समन्वयक धनंजय जाधव यांची कन्या निकिता जाधव या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. ‘सरकार जर, आमच्या मागण्या पूर्ण करत नसेल तर, आमची शेती सरकारने करावी आणि आम्हाला चतुर्थ श्रेणी कामगाराचा पगार द्यावा’, अशी मागणी देखील शेतकऱ्यांच्या मुलींनी केली आहे.

First Published on: February 8, 2019 8:13 AM
Exit mobile version