कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांचा प्रतिसाद, ३ लाख शेतकऱ्यांनी भरली ३१२ कोटींची थकबाकी

कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांचा प्रतिसाद, ३ लाख शेतकऱ्यांनी भरली ३१२ कोटींची थकबाकी

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सुरु केलेल्या नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ऑक्टोबर २०२०मध्ये जाहिर झालेल्या योजनेत विविध सवलती जाहिर झाल्या. राज्यात या सवलती लागू झाल्यापासून ३ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी एकूण ३१२ कोटी ४१ लाख रुपयांचे थकबाकी अर्ज भरले आहेत. या योजनेला इतका भरभरुन प्रतिसाद दिल्याने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे आभार मानले. सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राज्यशासनाने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडील १५ हजार कोटींची थकबाकी माफ करण्याचे ठरविले आहे.

तीन वर्षांच्या कालावधीत ही योजना राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांना सप्टेंबर २०२०च्या सुधारित मूळ थकबाकीवर ५०टक्के सवलत दिली जाणार आहे. त्याचबरोबर व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी संपूर्ण थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना ६६ टक्के इतकी सवलत दिली जाणार आहे. तर दोन वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर ३० टक्के सवलत दिली जाणार आहे. त्याचबरोबर तीन वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या मूळ थकबाकीवर २० टक्के सवलत दिली जाणार आहे.

नव्या कृषी पंप योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे २०१५ नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकारही माफ करण्यात येणार आहे. गावातून वसूल करण्यात आलेल्या थकबाकीच्या रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ही वीज पुरवठ्याशी संबंधित पायाभूत सुविधांवर खर्च करण्यात येणार आहे. पुढील ३ वर्षांत दिवसा शेतकऱ्यांना ८ तास वीज पुरवठा देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. पुण्यातून १३८ कोटी ९१ लाख रुपयांची महावितरण प्रादेशिक विभागनिहाय वसुली करण्यात आली आहे. तर कोकणातून ९५ कोटी ७३ लाख रुपये, औरंगाबादमधून ५९ कोटी ३७ लाख रुपये आणि नागपूरमधून १८ कोटी ३९ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.


हेही वाचा – कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय – फडणवीस

First Published on: February 26, 2021 5:22 PM
Exit mobile version