शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर करणार

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर करणार

मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या म्हणजे 24 फेब्रुवारीला जाहीर होणार असून, दुसरी यादी 28 फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घोषणा केली आहे.

महाविकास आघाडी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या तीन महिन्यांत ही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. पहिल्या सरकारची कर्जमाफीची योजना अजूनही सुरू आहे. त्यामुळे सर्व गोष्टी पूर्ण करूनच पुढे जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणार असून, उद्या लाभार्थी शेतकर्‍यांची यादी जाहीर करणार आहे. तसेच गिरणी कामगारांच्या घरासाठी 1 मार्च रोजी लॉटरी निघणार आहे. 35 लाख शेतकर्‍यांच्या कर्जखात्यांची यादी तयार केली असून, टप्प्याटप्प्याने कर्ज-माफीची अंमलब-जावणी करणार आहे. सरकारच्या योजना उघड्या डोळ्याने विरोधकांनी बघाव्या, असा चिमटाही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना काढला आहे. विरोधी पक्षाने केवळ टीका न करता सरकारच्या चांगल्या कामाचे कौतुकही करावे. सशक्त विरोध पक्ष म्हणून काम करावे. स्वतः काही करायचे नाही आणि आम्ही केलेल्या चांगल्या गोष्टींवर टीका करायची, अशी भूमिका विरोधी पक्षाची आहे.

त्यामुळे विरोधकांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज वाटत नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे, येथे सीएएवरून दंगे झाले नाहीत. मात्र, भाजपशासित राज्यांमध्ये दंगली झाल्या. जेएनयूमध्ये दहशतवादी घुसले, त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला, त्यांच्यावर कारवाई झालेली नाही, त्यामुळे भाजपाने बुडाखाली किती अंधार हे पाहावे, अशी जळजळीत टीकाही उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे.

गिरणी कामगारांच्या घरासाठी १ मार्चला लॉटरी
शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांनाही खुशखबर दिली आहे. गिरणी कामगारांना 1 मार्च रोजी लॉटरीद्वारे घरे वितरित करण्याची योजना राबवली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. गिरणी कामगारांच्या संघटनेची रविवारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली.

First Published on: February 24, 2020 6:58 AM
Exit mobile version