फादर फ्रान्सिस दिब्रिटो भूषवणार आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

फादर फ्रान्सिस दिब्रिटो भूषवणार आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड आज औरंगाबाद येथील महामंडळाच्या कार्यालयात पार पडली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. विशेष म्हणजे बैठकीपूर्वी नावाची चर्चा होऊ नये, यासाठी चारही घटक संस्थांना बैठकीच्या दिवशीच नावे मांडण्याची सूचना देण्यात आली होती. बैठकीत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावाने अग्रक्रम मिळवल्याने शेवटी एकमताने त्यांच्या नावावर अध्यक्षपदाची मोहोर उमटवण्यात आली.

साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याविषयी

कॅथॉलिक पंथीय ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून ओळखले जाणारे ‘फ्रान्सिस दिब्रिटो’ यांचा जन्म वसई येथील मराठी ख्रिस्ती कुटुंबात झाला. लेखक असलेले फ्रान्सिस दिब्रिटो हे पर्यावणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरोधात आवाज उठविणारे कार्यकर्ते, सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना नुकताच ‘बायबल- दी न्यू टेस्टामेंट’ या पुस्तकाच्या त्यांनी मराठीत केलेल्या ‘सुबोध बायबल- नवा करार’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा २०१३ या वर्षीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.

१५व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवलं

मराठी भाषिक ख्रिस्ती समाजाचे मुखपत्र असलेल्या ‘सुवार्ता’ या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. ‘हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून दिब्रिटो यांनी पर्यावरण जतन, संरक्षण आणि संवर्धनाची चळवळ उभी केली. वसईतील ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ याच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोहीम राबविली. पुणे येथे १९९२ मध्ये झालेल्या १५व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ‘तेजाची पाऊले’, ‘संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची- इस्रायल आणि परिसराचा संघर्षमय इतिहास’, ‘आनंदाचे अंतरंग- मदर तेरेसा’, ‘सृजनाचा मोहोर’, ‘ओअ‍ॅसिसच्या शोधात’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

First Published on: September 22, 2019 2:48 PM
Exit mobile version