अल निनोमुळे यंदा दुष्काळाची भिती; जिल्हा परिषद सीईओचे प्रशासनाला ‘हे’ निर्देश

अल निनोमुळे यंदा दुष्काळाची भिती; जिल्हा परिषद सीईओचे प्रशासनाला ‘हे’ निर्देश

नाशिक : जिल्ह्यात एल निनो परिस्थितीबाबत गुरुवारी (दि.२३) जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व विभागप्रमुख व गट विकास अधिकारी यांची दुरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेतली.

या बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्यात उद्भवणार्‍या एल निनो परिस्थितीबाबत सर्व गट विकास अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याचे निर्देश दिले. एल निनो परिस्थितीमुळे यंदाचा पावसाळा हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत पावसाळा लांबल्यास जिल्ह्यात टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, यावर मात करण्यासाठी आतापासून नियोजन केल्यास संभाव्य दुष्काळसदृश्य परिस्थितीपासून बचाव करता येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या बैठकीत सांगितले.

ग्रामीण भागातील टंचाई आराखडे हे लवकरात लवकर तयार करावेत. गेल्या 5 वर्षात ज्या ज्या ठिकाणी पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली, अशा गावांचा समावेश देखील टंचाई आराखड्यात करण्यात यावा, ग्रामपंचायतीचे पाण्याचे स्रोत, खासगी पाण्याचे स्त्रोत या माहितीची संकलन करून पाणी कपातीस आतापासूनच सुरुवात करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या बैठकीत दिले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी देखील एल निनोमुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीबाबत मार्गदर्शन केले.

ग्रामीण भागातील नागरिकांनी पाण्याचा वापर हा जपून करावा. पुढील काळात एल निनोमुळे पाऊस लांबल्यास पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागू शकते, त्यासाठी पाण्याचा वापर हा काटकसरीने करावा. : आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक.

First Published on: March 24, 2023 11:00 AM
Exit mobile version