डोंबिवली स्थानकात चेंगराचेंगरी हेाण्याची भिती…

डोंबिवली स्थानकात चेंगराचेंगरी हेाण्याची भिती…

डोंबिवली रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल धोकादायक झाल्याने बंद करण्यात आला आहे. मात्र सहा महिने होऊनही पुलाचे काम जैसे थे असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्थानकावरील मधल्या पुलावर प्रवाशांची खूपच गर्दी होत असल्याने चेंगराचेंगरी होण्याची भिती प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे. मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेरी पूल कोसळल्यानंतर डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणा-या पुलाचा प्रश्न चर्चिला गेला होता.

१९८० च्या दशकात हा पूल बांधण्यात आला होता. हा पूल धोकादायक बनल्याने अखेर रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेत १ एप्रिलपासून बंद करण्यात आला आहे. पूल बंद झाल्याने प्रवाशंची खूपच अडचण व गैरसोय होत आहे. त्यामुळे मधल्या पुलाचा वापर प्रवासी करत आहेत. एकाच वेळी दोन्ही बाजूला लेाकल आल्यानंतर रेल्वे स्थानकावर व पुलावर प्रवाशांची एकच झुंबड उडते. त्यामुळे या पुलावर परेल सारख्या दुर्घटनेची पूनरावृत्ती होण्याची भिती प्रवाशांमध्ये व्यक्त केली जात आहे.

तसेच पुलावर प्रचंड गर्दीच्या त्रासामुळे काही प्रवासी शॉर्टकटचा मार्ग अवलंबत फलाट क्रमांक तीन वरून एक नंबरला रेल्वे क्रॉसिंगचा मार्गाचा वापर करत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे. त्यामुळे पुलाचे काम युध्दपातळीवर करण्यात यावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. जुन्या पुलाची रूंदी ही ४.८ मीटर होती पण वाढत्या प्रवासी संख्येनुसार नवीन पूल हा ६ मीटर रूंदीचा बांधण्यात येणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पुलाच्या बांधणीच्या कामाला गती मिळाली नसल्याने डोंबिवलीकर प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे.

First Published on: September 28, 2019 6:27 PM
Exit mobile version