अहमदनगरमधील ५० टक्के पाणी योजना बंद

अहमदनगरमधील ५० टक्के पाणी योजना बंद

पाणी पुरवठा

नगर जिल्ह्यात ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या एकूण दीड हजार इतक्या संख्येने पाणी योजना असून यंदाच्या उन्हाळ्यात भूजल पातळीत वेगाने घट झाली असल्याने सुमारे ५० टक्के पाणी योजनांचे पाण्याचे उद्भव कोरडे पडल्याने या योजना बंद झाल्या आहेत. नगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये मिळून एकूण १ हजार ४१९ पाणी पुरवठा योजना आहेत. सद्यस्थितीत या पैकी ६०५ पाणी योजना बंद झाल्या असून ८०३ पाणी योजना देखील कशाबशा सुरू आहेत. पाणी पातळी आणखी घटल्यानंतर या योजनांचा पाणी पुरवठा देखील बंद होण्याची शक्यता आहे.

विविध तालुक्यातील योजना बंद पडल्या 

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने भूजलपातळीत फारशी वाढ झालीच नव्हती. त्यामुळे अगदी ऑक्टोबर महिन्यापासूनच काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. कर्जत व पाथर्डी तालुक्यात पाण्याचे उदभव वेगाने कोरडे पडू लागल्याने सर्वाधिक पाणी योजना बंद पडल्या आहेत. कर्जत तालुक्यात १२८ पैकी ११४ आणि पाथर्डी तालुक्यात १०४ पैकी ९८ योजना बंद पडल्या आहेत. अकोले तालुक्यात १५७ पैकी १९, संगमनेर तालुक्यात १७३ पैकी ४४, राहातामध्ये ५५ पैकी ३, राहुरी ५६ पैकी १, श्रीरामपूर तालुक्यात ८५ पैकी ३, नेवासे ५१ पैकी २२, शेवगाव ३१ पैकी १४, नगर तालुक्यात ७५ पैकी ४९, पारनेरमध्ये १६९ पैकी ८९, श्रीगोंदा १४५ पैकी ८२ आणि जामखेड तालुक्यातील १०६ पाणी योजनांपैकी ६३ पाणी योजनांचे पाण्याचे उदभव कोरडे पडल्याने या योजना बंद पडल्या आहेत. पाणी योजनांचे पाणी खंडित झाल्याने योजना बंद पडत चालल्या असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणार पाणी टंचाई निर्माण झाली आहे.सध्या जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीच्या कामात तर राजकीय नेते मंडळी प्रचारात गुंतलेली असल्याने पाण्याच्या समस्ये कडे सर्वांचेच थोडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवत आहे.

First Published on: April 3, 2019 4:08 PM
Exit mobile version