आरोग्य विभागात विशेषज्ञांची पदे तीन महिन्यात भरणार

आरोग्य विभागात विशेषज्ञांची पदे तीन महिन्यात भरणार

आरोग्य विभागात विशेषज्ञांची पदे तीन महिन्यात भरणार

आरोग्य विभागात विशेषज्ञांची रिक्त पदे तीन महिन्यात भरण्यात येणार असून सुमारे ५७४ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यातील आरोग्य संस्थांमधील सुमारे ५० टक्के रुग्णवाहिका बदलण्यात येणार असून त्यासाठी निधी उपलब्ध झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

सदस्य विकास ठाकरे यांनी विदर्भातील तज्ञ डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, राज्यात विशेषज्ञांची ९१३ पदे रिक्त आहेत. त्यातील ३०४ पदे सरळसेवेने तर २७० पदोन्नतीने अशी एकूण ५७४ पदे येत्या तीन महिन्यात भरण्यात येतील. त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही पदे भरल्यानंतर त्यांना चक्राकार पद्धतीने नियुक्त्या देण्यात येणार असून विदर्भाला प्राधान्य देण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

डॉक्टर, विशेषज्ञांची पदे थेट मुलाखतीच्या माध्यमातून भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असून लोकप्रतिनीधींनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कायकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडेही पाठपुरावा करून आपल्या भागातील पदे भरून घ्यावीत. ज्या आरोग्य संस्थेत डॉक्टर अथवा विशेषज्ञांची कमतरता आहे तेथे रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून खासगी डॉक्टरांची ऑन कॉल सेवा घेता येते असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान, आरोग्य संस्थांमधील ५० टक्के रुग्णवाहिका बदलण्याची आवश्यकता असून त्यासाठी निधी उपलब्ध झाल्याचे सांगत यावर्षी किमान ५० टक्के रुग्णवाहिका बदलण्यात येतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेच्या दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्या सुलभा खोडके, सदस्य किशोर जोरगेवार, सुभाष धोटे यांनी भाग घेतला.

 

First Published on: February 28, 2020 6:24 PM
Exit mobile version