लातूरकरांना तब्बल 45 दिवसांनंतर स्वच्छ पाणीपुरवठा सुरू

लातूरकरांना तब्बल 45 दिवसांनंतर स्वच्छ पाणीपुरवठा सुरू

एकिकडे वाढता उकाडा आणि अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे लातुकरांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले होते. पिण्याचे पाणी शुद्ध नसल्याने लातूरकरांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र अखेर स्वच्छ पाणी पुरवठा सुरू झाला आहे.

शहरात मागील 45 दिवसांपासून पिवळसर पाणी पुरवठा होत होता. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अनेक दिवसांच्या प्रयासानंतर पाण्यातील पिवळसर रंग नाहीसा करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे आता शहराला स्वच्छ पाणी पुरवठा केला जात आहे.

मागील 45 दिवसापासून लातूर शहराला पिवळसर रंगाचा दूषित पाणी पुरवठा केला जात होता. वेगवेगळे पक्ष, संघटना यांनी यावर आंदोलनंही केली. पाणी तपासणी करण्यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने ते पाणी पिण्यालायक आहे अशी खात्री दिल्यानंतरही लातूरकर त्यावर समाधानी नव्हते.

जलशुद्धीकरण प्रकल्पाची डागडुजी करण्यात आली आहे. मांजरा धरणातील पाणी पुरवठा केंद्रातील जॅकवेलवरील दारे उघडण्यात आली. त्यानंतर पाणी स्वच्छ स्वरूपात आले आणि मनपाच्या प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. लातूर महापालिकेची मुदत या महिन्यात संपणार आहे.

काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. अशा पार्श्वभूमीवर शहरात येणारे पिवळे पाणी सत्ताधारी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरले होते. शहरातील विविध भागात रोज पाणी पुरवठा केला जातो. प्रत्येक भागात 10 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. रविवारी पहिल्यांदा प्रयोगिक तत्वावर पाणी सोडून पाहिले असता ते स्वच्छ असल्याचं दिसून आलं.

सोमवारी शहरात नियमित स्वच्छ पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. इंडिया नगर, शाम नगर, पंचशील चौक भागात, केशव नगर जाफर नगर, सुळ गल्ली भागात स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात आला आहे.


हेही वाचा – केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या ताफ्यावर अंडे फेकण्याचा प्रयत्न

First Published on: May 16, 2022 11:16 PM
Exit mobile version