गर्दी महागात पडली, भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर गुन्हा दाखल

गर्दी महागात पडली, भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर गुन्हा दाखल

भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा घेतल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे अडचणीत आल्या आहेत. पंकजा यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

विजयादशमीच्या मुहुर्तावर रविवारी सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा ऑनलाईन घेण्याचं योजण्यात आलं होतं. मात्र, तरीही पंकजा मुंडेंच्या अनेक सर्मथकांनी यावेळी गर्दी केली. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन नमस्कार केला. त्यानंतर भगवान गडावर पूजा-अर्चना केली आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

ऑनलाईन दसरा मेळावा घेतल्याने पंकजा मुंडेंसह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये रासप नेते महादेव जानकर, रमेश कराड यांचाही समावेश आहे. अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.

दसर्‍या मेळाव्याच्या निमित्ताने भगवान बाबांच्या 25 फुटी मूर्तीला फुलांची सजावट करण्यात आली होती. भगवान बाबांच्या स्मृतिस्थळ परिसरात पंकजा मुंडे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भगवान बाबा स्मृतिस्थळ परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

First Published on: October 26, 2020 11:52 PM
Exit mobile version