मुंबईत बेस्टच्या बसला भीषण आग, २५ प्रवासी थोडक्यात बचावले

मुंबईत बेस्टच्या बसला भीषण आग, २५ प्रवासी थोडक्यात बचावले

मुंबईतील वांद्रे परिसरात बेस्टच्या बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत २५ प्रवासी बचावले आहेत. बेस्ट उपक्रमाने प्रवासी वाहतुकीसाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका बसमधील गिअर बाॅक्समध्ये अचानकपणे स्पार्क होऊन आग लागली. त्यामुळे या आगीत संपूर्ण बसगाडी जळून खाक झाली. सुदैवाने बसचालक व वाहक यांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने व त्यांना बसबाहेर सुरक्षितपणे काढल्याने २५ प्रवासी थोडक्यात बचावले. कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

बेस्ट उपक्रमाकडून प्राप्त माहितीनुसार, बेस्टच्या परिवहन विभागाने भाडेतत्त्वावर घेतलेली बस मार्ग क्रमांक सी – ५१ अनुक्रमांक १२, बस गाडी क्रमांक ७८७६ सांताक्रूझ आगार मातेश्वरी (बस वाहक क्रमांक १२२४२२ बस चालक क्रमांक ०२२१२१) ही बस गाडी २५ प्रवाशांना घेऊन सांताक्रुझ आगाराकडे अप दिशेने जात असताना दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास एस. वी. रोड, वांद्रे सिग्नल जंक्शन येथे गाडीच्या गिअर बॉक्सजवळ शॉर्टसर्किट होऊन स्पार्क झाले. त्यामुळे या सीएनजी बसमध्ये आग लागली. बसला आग लागली.

या आगीची चाहूल लागताच बस चालक व बसवाहकाने सतर्कता दाखवत तातडीने प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. त्यानंतर काही अवधीतच आग भडकली व संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने सदर बसमधील २५ प्रवासी थोडक्यात बचावले.

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन काही अवधीतच या बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले व आग विझविली आहे. सदर बसला आग का व कशी काय लागली,याबाबत अग्निशमन दल व पोलीस आणि बेस्टचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.


हेही वाचा : …त्यांनी मुंबईकरांची माफी मागावी; डान्सबारची उपमा देणाऱ्या राज ठाकरेंविरोधात राष्ट्रवादी आक्रमक


 

First Published on: January 25, 2023 7:59 PM
Exit mobile version