कोल्हापूर, कणेरीवाडीचा मान : राज्यात ठरली झेडपीची पहिली डिजिटल शाळा !

कोल्हापूर, कणेरीवाडीचा मान : राज्यात ठरली झेडपीची पहिली डिजिटल शाळा !

जिल्हा परिषदेची शाळा म्हटले की त्या शाळेकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिले जाते. अपुर्‍या सुविधा, विद्यार्थ्यांची कमी असलेली पटसंख्या, अपुरे शिक्षक आणि उत्तम शिक्षणाच्या नावाने बोंब… असा सर्वसाधारण समज झाला आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या कणेरीवाडी या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेने हा समज चुकीचा ठरवला आहे. करवीर तालुक्यातील या शाळेने झेडपी शाळांचे सर्व गैरसमज चुकीचे ठरवत राज्यातील पहिली डिजिटल शाळा होण्याचा मान मिळवला आहे.

डिजिटल ठरलेली ही झेडपीची शाळा पाहून कोणत्याही विद्यार्थ्यांना शाळेचा लळा लागेल, असे अतिशय आश्वासक चित्र या शाळेने उभे केले आहे. आजी-माजी विद्यार्थ्यांनी शाळेचा विकास व्हावा यासाठी निधी जमा केला आणि तब्बल २९ लाख रुपयांतून शाळा डिजिटल करण्यात आली. या शाळेसाठी केवळ ६ लाखांचा सरकारी मदत मिळाल्याचे येथील शिक्षकांनी सांगितले. शाळेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, तालुक्यात या शाळेत सर्वाधिक पटसंख्या अशी ओळख आहे. कोरोना काळात या शाळेचे खूप नुकसान झाले होते. मात्र, नवीन वर्षात शाळेचे रुप पालटले आहे. तंत्रज्ञानानेयुक्त अशी शाळा पाहून विद्यार्थी आवर्जून शाळेत येत आहेत. आजूबाजूच्या गावांमधून या शाळेत प्रवेशासाठी झुंबड पडते. आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून पालकांना सातत्याने प्रयत्न करावे लागत आहेत. शनिवारी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते या नव्या शाळेचे उद्घाटन झाले.

या शाळेत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी कॉम्प्युटर लॅब असून विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसून केवळ अभ्यासच नाही तर जागतिक ज्ञानाचे दरवाजे खुले झाले आहेत. वर्गात टीव्ही देखील लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना राज्याच्या संस्कृतीची चांगल्या प्रकारे ओळख व्हावी यासाठी शाळेत सर्वत्र पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरमधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, हा प्रयत्न करण्यात आला आहे.

First Published on: January 17, 2021 7:25 AM
Exit mobile version