त्या फोटोमागची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी

त्या फोटोमागची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी

सांगली जिल्ह्यातील महापूराने अनेक गावांमध्ये अक्षरश: हाहा:कार उडवला. या महापुराने अनेक संसाराचे होत्याचे नव्हते केले. ८ ऑगस्ट रोजी ब्रह्मनाळ गावात बोट उलटून १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेतील एका फोटोमुळे संपुर्ण महाराष्ट्र हळहळला. सुरुवातीला व्हॉटसअपवरील तो फोटो आजी-नातवाचा असल्याचा अनेकांचा समज झाला होता. मात्र त्या फोटोमागील सत्य हे अधिकच दु:खद आणि फोटोमागची कहाणी ह्दय पिळवटणारी आहे.

अश्विनी नरूटे यांनी त्या बोट अपघातात आपली दोन लहान मुले गमावली. त्यांचा चार महिन्यांचा राजवीर बोटीत बसताना गावातल्या एका आजीकडे होता. तर बोट बुडाली तेव्हा अडीच वर्षांची सोनाली पुराच्या पाण्यात वाहून गेली. अश्विनी नरुटे ब्रह्मनाळमध्ये आपल्या माहेरी आल्या होत्या. पाऊस खूप पडत होता. त्यादिवशी पूर्ण गावात पाणी शिरले होते. नरूटेसह गावकर्‍यांना गावातून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता. जेव्हा बोट उलटली तेव्हा राजवीर अश्विनी यांच्या हातातून निसटला. त्याला गावातील कस्तुरी वडेरे आजींनी पकडले. मात्र पुराच्या पाण्यात कस्तुरी आजी आणि ४ महिन्याच्या राजवीरचा मृत्यू झाला.

कस्तुरी आजींनी राजवीरला धरुन ठेवले
ब्रम्हनाळमधील त्या फोटोने सर्वांचेच मन हेलावून टाकले होते. त्या फोटोत दिसणार्‍या कस्तुरी वडेरे यांच्या मुलाशीही आपलं महानगरने बातचीत केली. ते म्हणाले की, “आम्ही प्रशासनाकडे मदत मागितली होती. मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे आम्हाला ग्रामपंचायतीची बोट वापरावी लागली. मात्र दुर्दैवाने हा अपघात घडला. केवळ दहा मिनिटात होत्याचे नव्हते झाले.

ब्रह्मनाळची घटना घडल्यानंतर सांगली आणि कोल्हापूरच्या पुराची दाहकता देशभर पसरली. काही काळातच प्रशासकीय यंत्रणाही खडबडून जागी झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रह्मनाळमधील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे. शासन मदत देऊन जरी यातून मोकळे होत असले तरी अश्विनी नरुटेची दोन्ही मुले मात्र तिला पुन्हा मिळणार नाहीत. सांगली जिल्ह्यात २००५ नंतर आलेला हा सर्वात मोठा पूर असल्याचे सांगितले जात आहे. २०१९ नंतर जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात पूर येईल, तेव्हा तेव्हा ’कस्तुरी आजींनी हातात घट्ट धरून ठेवलेला राजवीर’चा फोटो आपल्या डोळ्यासमोर आल्याखेरीज राहणार नाही.

आईच्या दोन्ही मुलांना पुराने गिळले
अश्विनी नरुटे यांना अडीच वर्षांची मुलगी सोनाली आप्पासो गडनेट्टी आणि चार महिन्यांचा राजवीर अशी दोन मुले होती. बोट बुडत असताना राजवीर कस्तुरी आजीच्या हातात गेला तर छोट्या सोनालीला तिच्या आजीने पकडून ठेवले होते. मात्र पाण्यात बुडत असताना सोनालीचा हात सुटला आणि ती पाण्यात दिसेनाशी झाली. अश्विनीच्या लहान भावाने आई आणि बहिणीला ट्युब टायर देऊन कसेबसे पाण्याच्या बाहेर काढले. मात्र दुर्दैवाने दोन लहान जीवांना त्यांना वाचविता आले नाही. काळाने दोघांनाही आईपासून हिरावून घेतले.

First Published on: August 14, 2019 6:42 AM
Exit mobile version