नौदलाचे माजी व्हाइस अॅडमिरल आवटी यांचं साताऱ्यात निधन

नौदलाचे माजी व्हाइस अॅडमिरल आवटी यांचं साताऱ्यात निधन

एम. पी. आवटी

नौदलातील माजी व्हाइस अॅडमिरल मनोहर प्रल्हाद म्हणजेच एम. पी. आवटी (वय ९१) यांचे शनिवार, ३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री निधन झाले. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील विंचुर्णी या मूळगावी अॅडमिरल आवटी यांनी अखेरचा श्वास घेतला. आवटी यांच्या निधनाने नौदलातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. नौदलप्रमुखांसह, नौदल व संरक्षण दलांमधील आजी माजी अधिकाऱ्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. व्हाइस अॅडमिरल आवटी यांनी नौदलात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. आरमारी इतिहासाविषयी प्रचंड जिव्हाळा असलेले अॅडमिरल आवटी हे मेरिटाइम हिस्ट्री सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक होते.

नौदलातील विविध नौकांचे नेतृत्व केले 

आवटी यांचा जन्म ७ सप्टेंबर १९२७ रोजी झाला होता. तर त्यांचे शालेय शिक्षण मुंबई तसेच पुण्यात झाले. तत्कालिन ट्रेनिंग शीप डफरिनमध्ये प्रशिक्षण घेऊन १९४५ साली ते रॉयल इंडियन नेव्हीत दाखल झाले. ब्रिटनमध्ये पुढील प्रशिक्षणानंतर १९५० मध्ये ते भारतात परतले. नंतर ते भारतीय नौदलात रूजू झाले. सिग्नल तसेच दळणवळणातील तज्ज्ञ असलेले आवटी यांनी रणजित, वेंदुरूथी, दिल्ली, किस्त्ना आदी नौदल नौकांवर सेवा बजावली. नौदलाच्या बेटवा, तीर आणि म्हैसूर या नौकांचे नेतृत्वही त्यांनी केले.

अखेरपर्यंत नौदलासी संबंधीत होते 

१९७१ च्या बांग्लादेश युद्धात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल आवटी यांना वीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. आवटी यांनी पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) प्रमुख, नौदल मुख्यालयातील मनुष्यबळ विभागाचे प्रमुख, मुंबईतील नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले होते. याच पदावरून मार्च १९८३ मध्ये आवटी निवृत्त झाले. मात्र निवृत्तीनंतरही ते इंडियन मेरिटाइम हिस्ट्री सोसायटीच्या माध्यमातून शेवटपर्यंत आरमारी इतिहासाला उजाळा देत राहिले.

First Published on: November 4, 2018 1:00 PM
Exit mobile version