जिल्हा शल्यचिकित्सकांसह महापालिकेचे चार डॉक्टर कोरोनाबाधित

जिल्हा शल्यचिकित्सकांसह महापालिकेचे चार डॉक्टर कोरोनाबाधित

जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या झपाटयाने वाढत असतानाच, आता जिल्हयातच्या आरोग्याची धुरा सांभाळणारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यासह महापालिकेचे चार डॉक्टर्सचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे बैठकीतील उपस्थितांचेही धाबे दणाणले आहे.

जिल्हयात कोरोना रूग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेचा धोका पाहता आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. यंदाच्या लाटेत कोरोनाचा संसर्ग झपाटयाने होत असल्याचे समोर आले आहे. नाशिक जिल्हयातही कोरोनाचा धोका वाढू लागला असून सद्यस्थितीत १८०० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे तिसर्‍या लाटेत आरोग्य विभागाची आणि कोरोना नियोजनाची जबाबदारी असलेले अधिकारीही आता कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने पुढील नियोजनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी दिंडोरीच्या खासदार तथा केंद्रिय मंत्री डॉ. भारती पवार, खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण झाली. राज्यातही ७० आमदार आणि अनेक मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे यावरून कोरोना संसर्गाचा धोका किती पटीने वाढतोय हे दिसून येते. नाशिक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. गुरूवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होेते यावेळी डॉ. थोरात हेही उपस्थित होते. त्यामुळे बैठकीतील अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

सर्व कार्यक्रम रदद
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पालकमंत्री छगन भुजबळ यांचे शुक्रवारी आयोजित सर्व कार्यक्रम रदद करण्यात आले आहे. मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारच्या कोरोना बैठकीत आणखी काही अधिकार्‍यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भुजबळ यांचाही स्बॅब तपासणी करण्यात येणार असल्याचे समजते.

जिल्हा नियोजन समिती बैठक ऑनलाईन
शनिवारी ८ जानेवारी रोजी होणारी पूर्वनियोजित जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन होणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी दिली. शनिवारी सकाळी १०:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ही बैठक होणार होती. परंतु जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर ही बैठक आता ऑनलाईन होणार आहे. सर्व सन्माननीय सदस्य व कार्यान्वयीन यंत्रणांना बैठकीची लिंक उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहाच्या आवारात कुणीही गर्दी करू नये, असे आवाहनही जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी केले आहे.

First Published on: January 7, 2022 12:12 PM
Exit mobile version