राज्यात चार वर्षात कोळशाच्या चौदा खाणी; ११ हजार ५०० कोटींची गुंतवणूक

राज्यात चार वर्षात कोळशाच्या चौदा खाणी; ११ हजार ५०० कोटींची गुंतवणूक

राज्यात येत्या चार वर्षांत चौदा खाणी सुरु होत आहेत आणि त्यातील तीन या वर्षी सुरु होतील, अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या कोळसा खाणींच्या उद्घाटनाच्या निमित्ताने देण्यात आली. विशेष म्हणजे या खाणींमुळे ११ हजार ५०० कोटींची गुंतवणूक होईल आणि सुमारे १३ हजार लोकांना रोजगार मिळेल, असे देखील यावेळी सांगण्यात आले.

वेस्टर्न कोलफिल्डच्या नागपूर जवळील आदासा आणि मध्यप्रदेशातील दोन कोळसा खाणींचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ऑनलाईन झाले. उध्दव ठाकरे यांनी या खाणींचे ऑनलाईन उद्घाटन केले.

आदासा खाणीत ३३४ कोटी रुपये गुंतवणूक केली जात असून, १.५ दशलक्ष टन कोळसा उत्पादन होणार आहे. ५५० जणांना रोजगार मिळणार आहे. दरम्यान संपूर्ण ग्रामीण भागाला अव्याहतपणे परवडणाऱ्या दरात व अखंडित वीज पुरवठा करण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच संपूर्ण जगात कोळसा खाणींमध्ये आपल्या देशाचा चौथा क्रमांक लागतो. मात्र, तरीदेखील आपण कोळशाची बाहेरून आयात करतो. कोळशाचे वीज निर्मितीतील महत्व अनन्यसाधारण आहे. आपण दर्जेदार कोळशाची उत्पादन क्षमता संपुर्णपणे उपयोगात आणली तर वीज निर्मितीचा प्रश्नही मिटेल, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

बंद खाणींवर झाडे फुलवा

कोळशाच्या खाणी जेव्हा उत्पादन पूर्ण झाल्यावर बंद केल्या जातात तेव्हा त्या तशाच न सोडता त्यावर झाडे फुलवून, त्या जागेवर जंगल तयार केल्यास पर्यावरणाला मदत होईल. कोळसा खाणी बंद करण्याचा कालावधी पण निश्चित केला पाहिजे असेही ते यावेळी म्हणालेत. अनेक वर्षांपासून रखडलेल्या नागपूर-नागभीड ब्रॉडगेज मार्गाचा शुभारंभही लवकरच करण्यात येईल. त्यादृष्टीने आवश्यक ती तयारी राज्य सरकारने केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

First Published on: June 6, 2020 6:54 PM
Exit mobile version