अकरावी सीईटीचे संकेतस्थळ बंद; विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यात अडचण

अकरावी सीईटीचे संकेतस्थळ बंद; विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यात अडचण

अकरावी सीईटीचे संकेतस्थळ बंद; विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यात अडचण

दहावीच्या निकालावेळी राज्य मंडळाच्या संकेतस्थळाला लागलेले ग्रहण सीईटीसाठी बनवलेल्या संकेतस्थळालाही कायम असल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारपासून सीईटी परीक्षेसाठी नोंदणीचे संकेतस्थळ सुरू केले. मात्र सलग दोन दिवसांपासून अकरावी सीईटीचे संकेतस्थळ तांत्रिक अडचणीमुळे बंद असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संकेतस्थळ पुढील काही दिवस बंद राहण्याची शक्यता मंडळाकडून वर्तवण्यात आली आहे.

मूल्यमापन पद्धतीनुसार दहावीचे निकाल जाहीर केले. त्यानंतर राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये समान न्याय मिळावा यासाठी अकरावी प्रवेशासाठी सीईटी प्रवेश प्रक्रिया घेण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात आला. त्यानुसार राज्य मंडळाकडून २० जुलैपासून सीईटी परीक्षेला नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली. ही नोंदणी २६ जुलैपर्यंत करण्याची मुदत विद्यार्थ्यांना देण्यात आली. मात्र पहिल्या दिवसांपासून सीईटीच्या लिंकला तांत्रिक अडचणीचा फटका बसला आहे.

मंगळवारी सकाळी ११.३० वाजता लिंक सुरू करण्यात आली. मात्र साईट ओपन होत नसल्याचे संदेश विद्यार्थ्यांना येऊ लागले. त्यानंतर हळूहळू ही प्रक्रिया धीम्यागतीने सुरू झाली. अनेकांनी दुपारी माहिती भरली, पण ती सेव्ह होत नसल्याचे सांगण्यात येत होते. अखेर सायंकाळनंतर संकेतस्थळ सुरळीत सुरू झाले. दिवसअखेर रात्री ८.३० वाजेपर्यंत सुमारे एक लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. पहिल्या दिवशी तांत्रिक अडचणीचा सुरू झालेली ही प्रक्रिया दुसर्‍या दिवशीही कायम राहिली. त्यातही दुसर्‍या दिवशी १६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याने दोन दिवसांमध्ये तब्बल १ लाख ४६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

संकेतस्थळ कधी सुरू होईल याबाबत निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रोज संकेतस्थळाला भेट देण्याऐवजी, जेव्हा संकेतस्थळ सुरू होईल, तेव्हा त्यांना कळवण्यात येईल. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळ तात्पुरत्या वेळेसाठी बंद करण्यात आल्याचा संदेश दिला असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले.

First Published on: July 21, 2021 9:17 PM
Exit mobile version