महिलेशी अश्लिल वर्तणूक करणे पडले महागात

महिलेशी अश्लिल वर्तणूक करणे पडले महागात

प्रातिनिधीक फोटो

महिलेशी अश्लील वर्तणुक करणे एका जवानाला महागात पडले आहे. हा जवान गडचिरोलीच्या एमआयडीसी परिसरातील मलिक बुधवानी यांच्या सिमेंट ब्रिक्स कारखान्यात काम करणाऱ्या मजूर महिलेशी अश्लील भाषेत संभाषण करत होता. याशिवाय तो महिलेला त्रास देखील देत होता. त्यामुळे गडचिरोली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा जवान अहेरी येथील सी-60 या विशेष नक्षल विरोधी कारवाई पथकाचा सदस्य आहे. त्याच्या विरोधात भादंवि चे कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

आरोपी मिथून रासेकर हा सी–60 चा जवान प्राणहिता उपजिल्हा पोलीस मुख्यालय अहेरी येथे कार्यरत आहे. तो गडचिरोली निवासी आहे. तो सोमवारी रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान एमआयडीसी क्षेत्रात मलिक बुधवानी यांच्या सिमेंट ब्रिक्स इंडस्ट्री जवळ आला आणि तिथे कार्यरत विटा मजुरांच्या तात्पुरत्या आवासा जवळ जाऊन तेथील एका मजूर महिलेशी अश्लील भाषेत बोलत तिला शरीरसुखाची मागणी करू लागला. तो तिच्याशी लगट करण्याच्या तयारीत होता. परंतु, सदर महिलेने अश्लील वाक्य ऐकताच भयभीत होऊन कारखान्याकडे धाव घेतली आणि थरथर कापत ही हकीकत मालकाला सांगितली.

हेही वाचा – महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

तत्काळ मालक मलिक बुधवानी आणि कामगार यांनी जाऊन त्या जवानाला पकडले. तेव्हा तो मुजोरी करीत होता. ‘मी सी–60 चा जवान आहे. माझे कोणीही वाकडे करू शकत नाही. मी एसपी लाही भीत नाही. हिम्मत असेल तर जा आणि गुन्हा नोंद करून दाखवा’, अशी धमकी देत होता. कारखान्याचे मालक मलिक बुधवानी यांनी आपल्या भ्रमणध्वनीवरून पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. मिथुन रासेकरला ताब्यात घेतले. पीडितेने दिलेल्या जबानीनुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार रासेकरला आरोपी ठरवत भादविच्या ५०९ या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. मंगळवारी सकाळी सुद्धा त्यास चौकशीसाठी बोलाविले होते. उद्या त्याला कोर्टात सादर केले जाणार असल्याची माहिती तपास अधिकारी पीएसआय पाटील यांनी दिली. अटक न करण्याचे कारण भादंवि कलम ५०९ दाखल झालेल्या गुन्ह्यात होणारी शिक्षा ही दोन वर्षे किंवा त्याहून कमी कालावधीची असून या कालावधीतील शिक्षेसाठी आरोपीला अटक करण्याची तरतूद नाही, असे तपास अधिकारी पीएसआय पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा – महिला पोलीस अधिकार्‍यास अश्लील संदेश

First Published on: July 17, 2019 2:59 PM
Exit mobile version